राम मंदिरात बसवले जाणार सोन्याचे 13 दरवाजे, मुख्य दाराचा फोटो आला समोर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:54 PM2024-01-09T21:54:52+5:302024-01-09T21:55:33+5:30
रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य-दिव्य करण्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे.
Golden doors in Ram Mandir Ayodhya: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा उद्घाटन आणि रामललाची प्रतिष्ठापणा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिरामध्येही कामाचा वेग वाढलाय. अशातच मंदिराबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
मंदिरात सोन्याचे दरवाजे
राम मंदिरात सोन्याचे दरवाजे बसवले जाणार आहेत. यासाठी मंदिरात जोरदार काम सुरू आहे. या सोनेरी दरवाजाचे पहिले फोटो समोर आले असून, हा दरवाजा राम लालाच्या गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे. असे आणखी 13 दरवाजे येत्या चार दिवसांत बसविण्यात येणार आहेत. हा पहिला दरवाजा सागवानाचा असून, त्यावर कोरीव काम केलेला सोन्याचा मुलामा लावण्यात येईल.
#RamMandirAyodhya's 1st Golden door has been installed.
— Avinash Devda (@avinash_devda) January 9, 2024
Another 13 such beautifully crafted doors will be installed in the next three days.#AyodhyaRamMandir#RamMandirpic.twitter.com/CyNZTR0l9p
तामिळनाडूतील कारागीर
मंदिराच्या बांधकामाशी संबंधित समितीने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात 13 दरवाजे बसवले जाणार आहेत. ते बनवण्याचे काम हैदराबादच्या 100 वर्षे जुन्या फर्म अनुराधा टिंबरला देण्यात आले आहे. या फर्मने अयोध्येत तात्पुरती कार्यशाळा तयार केली असून, त्यात हे दरवाजे नागर शैलीत तयार केले जात आहेत. दरवाजांच्या डिझाइनमध्ये संस्कृती आणि भव्यतेकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. तामिळनाडूतील कारागीर हे दरवाजे कोरण्याचे काम करत आहेत.
22 जानेवारीला यूपीच्या शाळांना सुट्टी
प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 22 जानेवारी रोजी सुट्टीचे आदेश दिले आहेत. यामुळे मुलांना त्यांच्या घरात बसून टीव्हीवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहता येईल. यासोबतच 22 जानेवारीला राज्यातील दारुची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.