राममंदिर भूमिपूजनाचा अयोध्येत सुवर्णक्षण, पाच शतकांच्या कडव्या संघर्षानंतर दिसला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 02:14 AM2020-08-06T02:14:20+5:302020-08-06T02:14:44+5:30
योगी आदित्यनाथ; मोदींमुळेच रामजन्मभूमी प्रश्न सुटला
अयोध्या : पाच शतकांच्या अविरत व कडव्या संघर्षानंतर राममंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णक्षण दिसला आहे. लोकशाही मूल्यांचा आदर करीत, राज्यघटनेच्या चौकटीत राहून व शांततामय मार्गाने राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यात आला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
राममंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर उपस्थित साधू-संत व निमंत्रितांच्या सभेत ते म्हणाले की, अयोध्येत राममंदिर उभे राहावे, असे स्वप्न गेल्या पाच शतकांपासून अनेक पिढ्यांनी उराशी बाळगले होते. हे स्वप्न सत्यात उतरावे म्हणून अनेकांनी संघर्ष केला होता. अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले. काही शतके त्या स्वप्नपूर्तीसाठी लढा देण्यात येत होता. लोकशाही मार्गाने व राज्यघटनेच्या चौकटीत राहून एखाद्या प्रश्नावर समर्पक तोडगा निघू शकतो, हे राममंदिर प्रश्नाच्या उदाहरणावरून भारताने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शीपणामुळेच राममंदिराचा प्रश्न सुटू शकला आहे. मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच राममंदिरावर तोडगा निघण्यासाठी योग्य वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मोदी यांच्या हस्तेच राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होतो आहे, हाही एक विशेष प्रसंग आहे. अयोध्येमध्ये भव्य राममंदिराचे बांधकाम शक्यतो लवकर पूर्ण करण्यात येईल.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, राममंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी साºया वातावरणात उत्साह आहे. हा प्रसंग भावनात्मक ही आहे. जातपात, प्रांतिक, भाषिक असे कोणतेही मतभेद न पाळता राममंदिर उभारण्यासाठी आतापर्यंत सारे झटले होते. तेच चित्र भविष्यातही सर्वांना दिसणार आहे. हा एका नव्या भारताचा प्रारंभ आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारला खूप मदत केली आहे. शरयू नदीच्या तीरावरील घाटांचे सौंदर्यीकरण, उत्तम रस्ते बांधणे, अशी अनेक कामे या शहरात पूर्ण झाली आहेत.
तिढा शांततेने सुटला याचा अभिमान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सुमारे ५०० वर्षे केलेल्या संघर्षाचे फलित राममंदिर भूमिपूजनाच्या रूपाने आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. १३५ कोटी भारतवासीयांची तसेच जगभरातील सर्व रामभक्तांची राममंदिर बांधण्याची इच्छा आता प्रत्यक्षात येणार आहे. राममंदिराचा तिढा अत्यंत शांततेने सुटला, याचा आम्हाला अभिमान आहे.
उपराष्टÑपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पत्नी उषा यांच्यासह उपराष्टÑपती भवनात रामायण पठण केले. त्यांच्या कुटुंबियांनी कोविडविरोधी लढा आणि राममंदिरासाठी १० लाखांची देणगी दिली.