डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 08:50 AM2024-01-07T08:50:26+5:302024-01-08T17:39:23+5:30
हैदराबाद ते अयोध्या असा हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, २२ जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचण्यासाठी रामभक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येकडे निघाले आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षांची आणि प्रतिक्षेचं फलित म्हणजे २२ जानेवारीचा सोहळा आहे. राम मंदिर उभारणीसाठी कारसेवा दिलेल्या रामभक्तांसाठी या सोहळ्याचं वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे, कुणी पायी, कुणी दुचाकीवर, कुणी रेल्वेने, तर कोणी विमानाने अयोध्येतील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहे. हैदराबादमधील एका रामभक्ताने हजारो किमीचा पायी प्रवास करुन अयोध्येची वाट धरली आहे. चल्ला श्रीनिवास शास्त्री असं त्यांचं नाव असून ते ६४ वर्षांचे आहेत.
हैदराबाद ते अयोध्या असा हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत. आपल्या डोक्यावर सोन्याच्या पादुका ठेऊन त्यांची ही यात्रा सुरू झाली आहे. या पादुकांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. त्यामुळे, या पादुकांची किंमत ६४ लाख रुपये आहे. यापूर्वी शास्त्रींनी चांदीच्या ५ वीटा राम मंदिरासाठी दानपेटीत अर्पण केल्या आहेत. ते रामेश्वरम मार्गाने अयोध्येची यात्रा करत आहेत. आपल्याकडील सोन्याच्या चरण पादुका ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देणार आहेत.
आपल्या पायी यात्रेत प्रभू श्रीरामांनी ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले, त्या प्रत्येक शिवलिंगाचे दर्शन घेऊनच ते पुढे प्रवास करणार आहेत. २० जुलै रोजी त्यांनी आपली अयोध्या यात्रा सुरू केली होती. मात्र, मध्येच त्यांना युकेला जावे लागले. त्यामुळे, त्यांची यात्रा थांबली होती. मात्र, तेथून परतल्यानंतर त्यांनी पुन्हा यात्रा सुरू केली. सध्या ते, उत्तर प्रदेशपासून २७२ किमी दूर चित्रकूट येथे आहेत. ओडिशातील पुरी, महाराष्ट्रातील त्र्यंबक, गुजरातचे द्वारका मंदिरात दर्शन करुन ते अयोध्येला पोहोचत आहेत. पुढील १० दिवसांत अयोध्येत पोहोचण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. त्यांच्यासोबत त्यांचे ५ सहकारीही आहेत.
शास्त्री यांच्या वडिलांनी अयोध्येसाठी कारसेवा केला होती. ते हनुमानाचे निस्सीम भक्त होते. अयोध्येत राम मंदिर बनलं पाहिजे, अशी त्यांनी मनोकामना होती. त्यामुळे, वडिलांची इच्छा पूर्तीसाठी मी अयोध्येची वारी करत असल्याचं शास्त्रींनी सांगितलं. शास्त्री हे अयोध्या भाग्यनगर फाऊंडेशनचे संस्थापकही आहेत. अयोध्येत घर घेऊन तिथेच स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे.