शाब्बास पोरी! पानवाल्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी; केली कौतुकास्पद कामगिरी, झाली अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 03:17 PM2023-04-13T15:17:08+5:302023-04-13T15:19:27+5:30
एका पान विक्रेत्याच्या मुलीने UPPCS 2022 मध्ये 21 वा क्रमांक मिळवून तिचे स्वप्न साकार केले आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. अनेक जण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील एका पान विक्रेत्याच्या मुलीने UPPCS 2022 मध्ये 21 वा क्रमांक मिळवून तिचे स्वप्न साकार केले आहे. ज्योती चौरसिया SDM बनली आहे. ज्योतीला हे यश तिच्या 6व्या प्रयत्नात मिळाले.
गोंडाचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी डॉ. रोशन जेकब यांच्याकडून तिला खूप प्रेरणा मिळाल्याचे ज्योती सांगते. ज्योती लखनौहून गोंडा येथील तिच्या घरी आली तेव्हा ढोल-ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. नातेवाईक असो किंवा शेजारी, सर्वांनी ज्योतीचे पुष्पहार आणि आरती करून स्वागत केले. ज्योतीचे वडील हेमचंद चौरसिया सांगतात की, आज मी खूप आनंदी आहे. जे अपेक्षित होते तेच मुलीने केले आहे.
ज्योतीने करून दाखवलं
ज्योतीचे वडील हेमचंद चौरसिया हे मूळचे देवरिया जिल्ह्यातील असून ते नोकरीच्या शोधात 1997 मध्ये गोंडा येथे आले आणि येथेच स्थायिक झाले. हेमचंद चौरसिया यांनी पानटपरीतून कमाई करून मुलांना चांगले शिक्षण दिले. ज्योतीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. ज्योतीचा मोठा भाऊ संदीप हाही अभ्यासात चांगला होता, पण त्याला यश मिळाले नाही. असे असतानाही वडिलांनी मुलीच्या तयारीत कोणतीही कसर सोडली नाही आणि शेवटी ज्योतीने करून दाखवलं.
हिंमत हारली नाही
ज्योतीने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण गोंडा येथे केले आणि लखनौमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ज्योतीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने 2015 पासून UPPCS परीक्षा द्यायला सुरुवात केली तेव्हा तिला पेपरही पूर्ण करता आला नाही. पण तिने धीर सोडला नाही आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. यावेळी, 6व्या प्रयत्नात ज्योतीने प्रथमच परीक्षा क्लिअर केले, मेन क्लिअर केले आणि मुलाखत उत्तीर्ण होऊन ती SDM झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"