महिलेऐवजी पुरूषाचा दिला मृतदेह; अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच आला फोन अन् उडाला एकच गोंधळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 11:12 AM2022-04-25T11:12:24+5:302022-04-25T11:13:09+5:30
Uttar Pradesh : एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला.
गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडाच्या कर्नलगंज येथील शवविच्छेदन गृहामध्ये मृतदेह बदलल्याची घटना समोर आली आहे. यानंतर कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला.
कुटुंबीयांना महिलेचा नव्हे तर पुरुषाचा मृतदेह देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन गृहाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी सीएमओने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणी सीएमओ राधेश्याम केसरी यांनी सांगितले की, शवविच्छेदन गृहात मृतदेह बदलल्याची तक्रार आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
हे प्रकरण कोतवाली कर्नलगंज भागातील गुरसाडी गावचे आहे. येथे गेल्या शुक्रवारी 40 वर्षीय रिता देवी यांना वादात मारहाण करण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. रविवारी कुटुंबीय महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी पोहोचले होते. त्याचबरोबर, याप्रकरणी आरोपी संजयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडलं?
रविवारी दुपारी 4 ते 5 या वेळेत मृत रिता देवी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह देण्यात आला. आम्ही सर्वजण मृतदेह घेऊन गुरसाडी या गावी आलो होतो. त्यानंतर तासाभराने शवविच्छेदन गृहामधून एक फोन आला. त्यावेळी तुम्ही लोक दुसऱ्या मृतदेहासोबत घरी गेला आहात. तुमच्याकडे जो आहे तो पुरुषाचा मृतदेह आहे. तो परत घेऊन या आणि महिलेचा मृतदेह घेऊन जा, असे फोनद्वारे सांगण्यात आल्याचे मृत रिता देवी यांचे पती सुरेश कुमार यांनी सांगितले. यानंतर एकच गोंधळ उडाला.
वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार
रविवारी कोतवाली नगर येथील गोंडा पोलिसांनी रीता देवी (वय 40) या महिलेचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह न देता अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. त्यामुळे महिलेचे कुटुंबीय घरी पोहोचले, त्यानंतर फोन करून पुन्हा मृतदेह गोंडा शवविच्छेदन गृहामध्ये आणण्यास सांगितले. मृतदेह घेऊन नातेवाईक गोंडा येथे गेले असता त्यांना महिलेचा मृतदेह मिळाला. त्यानंतर सायंकाळी उशिरा नातेवाईक मृतदेह घेऊन घरी पोहोचले. जिथे वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.