गुड बाय 2016 - दहशतवाद, असहिष्णुता अन् सर्जिकल स्ट्राइक

By admin | Published: December 30, 2016 02:21 AM2016-12-30T02:21:05+5:302016-12-30T02:21:05+5:30

सीमेवरील पाकसमर्थित दहशतवाद, देशांतर्गत इसिसच्या (इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) कारवाया आणि असहिष्णुतेविरुद्ध समाजमनातील वाढता आक्रोश

Good By 2016 - Terrorism, Intolerance and Surgical Strikes | गुड बाय 2016 - दहशतवाद, असहिष्णुता अन् सर्जिकल स्ट्राइक

गुड बाय 2016 - दहशतवाद, असहिष्णुता अन् सर्जिकल स्ट्राइक

Next

- सविता देव हरकरे

सीमेवरील पाकसमर्थित दहशतवाद, देशांतर्गत इसिसच्या (इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) कारवाया आणि असहिष्णुतेविरुद्ध समाजमनातील वाढता आक्रोश यामुळे देशापुढे निर्माण झालेले आव्हान २०१६ च्या मावळतीलाही कायम राहिले.
राजकारणात संपूर्ण वर्ष दहशतवाद आणि असहिष्णुता हे दोन परवलीचे शब्द झाले होते. तर दुसरीकडे देशभक्तीचा जणू महापूर आला होता. आम्ही किती देशभक्त आणि तुम्ही किती देशद्रोही हे सिद्ध करण्याची स्पर्धा चांगलीच रंगली होती. सरत्या वर्षाचा सूर्योदयच दहशतवादी हल्ल्याने झाला. २ जानेवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाईदल तळावर शक्तीशाली हल्ला केला आणि पुढे वर्षभर हल्ल्यांचे हे सत्र सुरुच राहिले. जुलै महिन्यात दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोरे हिंसाचाराच्या आगीत होरपळले आणि त्याची परिणिती उरी हल्ल्यात झाली. भारतानेही कठोर पावले उचलत पाकला धडा शिकविण्याकरिता पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक केले. सीमेवर अशी युद्धजन्य परिस्थिती असतानाच देशांतर्गत पसरत चाललेले इसिसचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी धाडसत्रे राबवावी लागलीत. एकीकडे देशांतर्गत व बाह्य सुरक्षेच्या गंभीर समस्येचा सामना करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या आणि दिल्लीतील जेएनयूमधील वाद हाताळताना झालेल्या घिसडघाईमुळे लोकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. असहिष्णुतेविरुद्ध लाटेचा हा प्रवाह एवढा वेगवान होता की तो थोपविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकार्यांना फार मोठी सर्कस करावी लागली. हा सर्व गदारोळ सुरु असताना देशाला काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे मनसुबे मात्र कायम होतेच. अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील घटनाक्रमांनी त्याची प्रचिती आली. या दोन्ही राज्यांचा ताबा मिळविण्याकरिता सत्ताधाऱ्यांकडून साम,दाम,दंड,भेदाचा वापर झाला. राष्ट्रपती राजवटीचा डाव खेळला गेला. पण न्यायालयीन लढाईत मोदी सरकारला मात खावी लागली. राजकीय सारीपाटाचा विचार केल्यास मावळत्या वर्षात पश्चिम बंगाल, आसाम,केरळ,तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील निवडणुकांत भाजपाचा मोठा विजय अन काँग्रेसचा पराभव असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न झाला खरा पण प्रत्यक्षात आसाम वगळता इतर चार राज्यात भाजपाच्या पदरात फारसे काही पडले नाही.
मतदारांच्या टक्केवारीत वाढ झाली एवढेच. नववर्षही निवडणुकांचेच असणार आहे. उत्तर प्रदेशसह पंजाब,उत्तराखंड,मणिपूर,गोवा, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पडघम वाजू लागले आहेत. भाजपाच्या काँग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी जनता किती साथ देते ते या निवडणुकांमध्ये कळेलच. पण नोटाबंदीमुळे सामान्यांवर बँकांसमोर रांगेत जगण्याची जी वेळ आली त्याचे पडसाद मात्र निश्चित उमटतील.

रेल्वे अर्थसंकल्प इतिहासजमा
गेली तब्बल ८२ वर्षे स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलिन करण्याचा निर्णय २१ सप्टेंबरला झाला. आता वर्षाअखेरीस स्वतंत्र रेल्वे प्राधिकरण स्थापनेचा सरकारचा प्रस्ताव बघता रेल्वे कात टाकणार हे निश्चित झाले आहे. दररोज सुमारे सव्वा कोटी लोकांसह प्रवास करणाऱ्या ऐतिहासिक भारतीय रेल्वेने खासगीकरणाऱ्या दिशेने आपला प्रवास सुरु केला असल्याचे समजले जात आहे.

कन्हय्याकुमारचा झंझावात
हैदाबाद विद्यापीठाच्या अन्यायकारक वर्तणुकीचा निषेध म्हणून तेथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने केलेली आत्महत्या आणि दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हय्याकुमार याला फेब्रुवारीत देशद्रोहाच्या आरोपाखाली झालेली अटक यामुळे देशात असहिष्णुतेविरोधात वातावरण निर्माण झाले होते. अनेक राज्यांत मोर्चे निघाले,आंदोलने झाली. अनेक शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि सिनेकलावंतांनी पुरस्कार वापसीचे शस्त्र उगारले. पुढे तीन आठवडे तुरुंगात राहून जामिनावर सुटलेला कन्हय्याकुमार ठिकठिकाणी सभांना संबोधित करु लागला. केवळ एका घटनेने त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. एवढे की तो तरुणांसोबतच काही राजकीय पक्षांच्या गळ्यातील ताईत बनला.

नीटचा घोळ
सर्व सरकारी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठ आणि खासगी महाविद्यालयांना यावर्षीपासून नीट (वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा ) बंधनकारक करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने लाखो विद्यार्थी प्रचंड तणावात आले होते. पण या निर्णयाला आंशिक बगल देण्यासाठी सरकारने वटहुकूमाचा मार्ग अवलंबल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे.

उत्तर प्रदेशातील यादवी
कौटुंबिक वाद आणि पक्षांतर्गत कुरघोडीने उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षात यादवी निर्माण झाली होती. परंतु पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यांच्या रथयात्रेला हिरवी झेंडी दाखवून तुर्तास तरी यादवी शमल्याचे दर्शविले आहे.

पूनम महाजन भाजयुमो अध्यक्षपदी
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या खासदार पूनम महाजन यांची डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भाजपा युवामोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. दिल्लीतील जंगी मिरवणुकीनंतर त्यांनी पदाचे सूत्रे स्वीकारली आहेत.

अंतराळातील नवा अध्याय
इस्रोने २३ मे रोजी स्वदेशी स्पेस शटलची यशस्वी वापसी करुन अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहिला. अंतराळ प्रवेशावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पुनर्वापर योग्य रॉकेट विकासाच्या दिशेने टाकलेले हे दमदार पाऊल आहे. आयआरएनएसएस-१ जी या सातव्या व अंतिम उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करुन भारताने अमेरिकेच्या जीएसएसच्या धर्तीवर संपूर्ण स्वदेशी क्षेत्रीय दिशादर्शक प्रणाली उभारण्याची ऐतिहासिक मोहीम फत्ते केली. अणुइंधनावर चालणारी अण्वस्त्रधारी भारतात बांधलेली पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंत फेब्रुवारीत नौदलात कामगिरीसाठी सज्ज झाली.

तिहेरी तलाक/ सबरीमाला
तीनदा ‘तलाक’ उच्चारत दिला जाणारा घटस्फोट घटनाबाह्य आणि मुस्लिम महिलांवर अन्याय करणारा आहे. या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाने ही प्रथा कालबाह्य, अमानवीय आणि धर्माला अनुसरुन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुस्लिम महिलांच्या व्यथा कमी करण्यासाठी पर्सनल लॉमध्येही बदलाचा मुद्दा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. पण सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
केरळच्या सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

मानकरी
भारतीय संगीतकार ए.आर. रेहमान पुन्हा एकदा आॅस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. ‘पेले: बर्थ आॅफ ए लिजेंड ’ या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना नामांकन मिळाले आहे.
ग्रामीण वास्तवाचे प्रतीक असलेल्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहाचे लेखक आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
ज्येष्ठ बंगाली कवी शंख घोष हे प्रतिष्ठित ज्ञानपीठचे मानकरी ठरले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी लढा देणारे बेजवाडा विल्सन आणि चेन्नईचे गायक टी.एम. कृष्णा यांना मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला.

जयललितांची एक्झिट
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले. त्यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने तेथील पाचशेवर लोकांनी मृत्यूला कवटाळले. वर्षाच्या प्रारंभीच २ जानेवारीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्ध्देन्दू भूषण उपाख्य भाई बर्धन यांच्या निधनाने कामगार चळवळीची कधीही न भरुन निघणारी हानी झाली. सरत्या वर्षात ज्या नामवंतांना देश मुकला त्यात ज्येष्ठ लेखक चो रामास्वामी, प्रसिद्ध गायक बालमुरलीधरन, महान नृत्यांगना मृणालिनी साराभाई, ज्येष्ठ शायर निदा फाजली, लोकसभेचे माजी अध्यक्षद्वय बलराम जाखड, पी.ए. संगमा, परमेश्वर गोदरेज यांचा समावेश आहे.

लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीचे रणकंदन
शासनाने लष्कर प्रमुखपदी व्हाईस चीफ आॅफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची तर हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल बी.एस. धानोआ यांची १७ डिसेंबरला नियुक्ती केली. परंतु लष्कर प्रमुखाची नियुक्ती करताना सेवाज्येष्ठता डावलण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला पण सुरक्षेबाबत परिस्थिती लक्षात घेता रावत यांची नियुक्ती झाली असल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांनी त्यांची बोळवण केली. संरक्षणसंबंधी महत्वाच्या पदांवर नियुक्ती करताना गुप्तवार्ता विभागाचे (आयबी) प्रमुखपदी राजीव जैन तर रॉ (रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस विंग ) ची जबाबदारी अनिलकुमार धस्माना यांच्यावर सोपविली.

नेताजींच्या फाईल्स
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका वठविणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स २३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुल्या केल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची आशा पल्लवीत झाली.

सरन्यायाधीशपदी केहर
देशाचे ४४ वे सरन्यायाधीश म्हणून जगदीशसिंग केहर यांची नियुक्ती झाली असून हा मान पटाकाविणारे ते शीख समुदायातील पहिले न्यायाधीश आहेत. नववर्षात ४ जानेवारीला ते सूत्रे स्वीकारतील.

दुर्घटनांचा हादरा
- इंदूर-पाटणा एक्स्प्रेसला २० नोव्हेंबरला कानपूरजवळ झालेल्या अपघातात १४५ प्रवासी ठार तर शेकडो जखमी झाले.
- मध्य दिल्लीत फिक्कीच्या इमारतीतील नॅचरल हिस्ट्री म्युझियम २६ एप्रिलला लागलेल्या आगीत जळून खाक झाले.
- केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या प्रसिद्ध पुत्तिंगलदेवी मंदिर परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीत भीषण आग लागून ११० भाविक मृत्युमुखी पडले तर ३८० वर जखमी झाले.
- ३१ मार्चला उत्तर कोलकात्याच्या वर्दळीच्या मुख्य मार्गावर निर्माणाधिन उड्डाणपूल कोसळून २१ लोक ठार आणि ८८ जखमी झाले.
- अरुणाचलप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांनी ९ आॅगस्टला आत्महत्या केली.

Web Title: Good By 2016 - Terrorism, Intolerance and Surgical Strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.