‘अच्छे दिन’ हे तर प्रत्येकाच्या मानण्यावर असतात : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:04 AM2017-09-08T04:04:08+5:302017-09-08T05:14:58+5:30
‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी अशी अपेक्षा करतो.
पणजी : ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी अशी अपेक्षा करतो. देशातील गरीब माणसाच्या मनात सुख समाधान नांदत असते; पण श्रीमंत माणसांच्या घरांमध्ये अस्वस्थता असते, असे निरीक्षण केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदविले.
गुरुवारी ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीतर्फे आयोजित ‘लोकमत गोवन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात गडकरी यांची प्रकट मुलाखत झाली. वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली. गडकरी म्हणाले, केंद्रात जेव्हा काँग्रेसप्रणित यूपीए सरकारची राजवट होती, तेव्हा देशातील महागाईचा दर १८.८ टक्के होता, तर आता महागाईचा दर केवळ ४ टक्के आहे. कोणीही पंतप्रधान झाला म्हणून लगेच सगळ्या गोष्टी होणार नाहीत. ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर आणि समाधानावर असतात. पंतप्रधान कोणा खासदाराला बोलू देत नाहीत, हा महाराष्ट्रातील एका खासदाराने केलेला आरोप चुकीचा आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांची खाती बदलण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आम्हा चौघा केंद्रीय मंत्र्यांना बसून सर्व मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. त्यानुसार मी, अरुण जेटली, सुषमा स्वराज व राजनाथ सिंग एकत्र बसलो. प्रत्येक मंत्र्याकडील खात्यांचे मूल्यांकन केले व अहवाल पंतप्रधानांना दिला. त्यानंतर कुणाला कोणते खाते द्यावे व कुणाकडून कोणते खाते काढून घ्यावे, हे ठरविण्याचा अधिकार शेवटी पंतप्रधानांचाच असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याबाबतचा निर्णय घेत नाही. संघाचा संबंध येत नाही, असे गडकरी म्हणाले. मला स्वत:ला जल या विषयात खूप रस आहे. मी गेली दहा-बारा वर्षे या विषयी काम करत आलो आहे. त्यामुळे जलस्रोत खाते माझ्याकडे आले, या विषयी आनंद आहे; पण मी ते खाते मागितले नव्हते. तुम्हाला जे काम व्हायला हवे असे वाटते व जे होणे अशक्य झाले आहे, असे काम माझ्याकडे सोपवा. मी ते करून दोन वर्षांत शक्य करून दाखवतो, एवढेच मी पंतप्रधानांना सांगितले होते. पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी जलस्रोत खाते देऊन नद्यांच्या स्वच्छतेचेही काम सोपवले आहे. मी ते करून दाखवीन, असे गडकरी म्हणाले. गंगा नदी शुद्ध करण्याची आणि नद्या जोडणी प्रकल्प राबविण्याची संधी मला मिळाली आहे. त्या विषयी मला आनंद वाटतो, असे गडकरी यांनी नमूद केले.
सर्वांनाच भाजप प्रवेश नाही!
विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा, असे मला वाटते; मात्र राहुल गांधी यांनाच पक्ष विसर्जित करावा, असे वाटत असावे. विविध पक्षांमधून येणाºया सर्वांनाच भाजपमध्ये घेतले जात नाही. फक्त १० टक्क्यांना घेतले आहे, अजून ९० टक्के प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, अशी मार्मिक टिप्पणी गडकरी यांनी केली.