अच्छे दिन वाले सरकार नापास झाले - राहुल गांधी
By admin | Published: April 20, 2015 04:29 PM2015-04-20T16:29:36+5:302015-04-20T17:04:02+5:30
केंद्रातील अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - मोदी सरकार हे 'सुटबूट'वाल्यांचे सरकार असून अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे. राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला असून मोदी सरकार हे उद्योजकांचे सरकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळी काँग्रेसचे सर्व खासदार संसदेत उपस्थित होते. यूपीए सरकारच्या काळात शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव मिळत होता. पण मोदी सरकारने शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव दिला नाही असा आरोप त्यांनी केला. दोन्ही सरकारच्या काळातील तफावत मांडण्यासाठी राहुल गांधी यांनी आकडेवारी सादर करत सत्ताधा-यांची पोलखोल केली. केंद्र सरकार शेतकरी व कामगार वर्गाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या आकडेवारीसंदर्भात पंतप्रधान व केंद्राच्या अन्य मंत्रालयांमध्ये समन्वयच नाही. म्हणून मोदींनी शेतक-यांमध्ये जाऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
देशातील ६० टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मोदी यांना राजकारणाची चांगली जाण आहे. मग अशा स्थितीत ते ऐवढ्या मोठ्या वर्गाला कसे दुखवू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नितीन गडकरींचे कौतुक
लोकसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी थेट नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे असे सांगत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे, जे मनात आहे तेच बोलतात, शेतक-यांनी केंद्र सरकारवर अवलंबून राहू नये असे गडकरींनी म्हटले होते. ते योग्यच होते असा चिमटाही त्यांनी काढला.