अच्छे दिन! सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात होणार मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 06:33 PM2018-08-01T18:33:16+5:302018-08-01T18:37:32+5:30
केंद्र सरकारकडून आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता बहुतांश निर्णय जनतेच्या हिताचे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता बहुतांश निर्णय जनतेच्या हिताचे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारकडून 'फिटमेंट फॅक्टर'मध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात तब्बल 3 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
सरकारने फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.57 वरुन वाढ होऊन 3 होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 18 ते 21 हजार रुपयांची वाढ होईल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 हजार रुपये बेसिक पगार मिळणार आहे. मात्र, या बेसिक पगारात वाढ करुन तो 26 हजार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचे वय 62 वर्षे केले जाऊ शकते, अशीही माहिती आहे. जवळपास 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल.
केंद्र सरकारकडून वेतनवाढीची घोषणा कधी होईल, याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, याच महिन्यात या पगारवाढीची घोषणा करण्यात येऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. तर 15 ऑगस्ट रोजी मोदींकडून याबाबत घोषणा केली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. पण, काही अहवालांचा दाखला घेतल्यास नोव्हेंबर 2018 पर्यंत ही पगारवाढ करण्यात येईल. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.