रेडिओला अच्छे दिन, "मन की बात"द्वारे कमावले करोडो रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 09:51 PM2017-07-19T21:51:09+5:302017-07-19T21:51:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "मन की बात" या कार्यक्रमामुळे सरकारी रेडिओ स्टेशनला व्यवसायिक फायदा झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "मन की बात" या कार्यक्रमामुळे सरकारी रेडिओ स्टेशनला व्यवसायिक फायदा झाला आहे. ऑल इंडिया रेडिओला मन की बात मुळे दहा कोटी रुपयांची कमाई झाली आहे. लोकसभेत बोलताना माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या मन की बातमधून ऑल इंडिया रेडिओने 2016-17या आर्थिक वर्षात 5.19 कोटींची कमाई केली आहे, तर 2015-16 मध्ये 4.48 कोटींची कमाई केली होती.
पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम हिंदी भाषेशिवाय 18 प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येतो. याशिवाय इंग्रजी आणि संस्कृत भाषांमध्येही या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते, अशी माहिती राठोड यांनी लोकसभेला दिली
3 ऑक्टोंबर 2014 मध्ये मन की बात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बादद्वारे जनतेशी संवाद साधतात. मन की बातमधून देशातील महत्त्वाच्या घटनांवर पंतप्रधान भाष्य करतात. यासोबतच देशातील सणांनिमित्त शुभेच्छा देतात. याशिवाय चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे कौतुकदेखील केले जाते.
कार्यक्रमापूर्वी पाच मिनिटं आणि कार्यक्रमानंतर दोन मिनिटांची जाहिरात प्रसारित करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. या सात मिनिटांत ऑल इंडिया रेडिओ स्वत:च्या कार्यक्रमांची जाहिरातही करते. ऑल इंडिया रेडिओकडून मोदींच्या या कार्यक्रमादरम्यान 10 सेकंदाच्या एका जाहिरातीसाठी दोन लाख रूपये घेण्यात येतात.