चांगले दिवस आता गेले - शरद पवार
By admin | Published: September 26, 2014 01:54 AM2014-09-26T01:54:36+5:302014-09-26T01:54:36+5:30
केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे
नवी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केंद्रातील आताच्या सरकारमुळे चांगले दिवस आता गेल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून, आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
नवी मुंबईमधील बाजार समितीमध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे झालेल्या माथाडी मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले की, काही दिवस देश व राज्यातील वातावरण वेगळे झाले होते. यामुळे केंद्रातील सत्तेत बदल झाला. चांगले दिवस येणार, असे स्वप्न दाखविल्यामुळे लोकांनी हा बदल घडविला. परंतु चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे. कृषिमंत्री असताना साखर व दूधपावडर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले. निर्यात करताना नुकसान झाल्यास अनुदान देण्यास सुरुवात केली. परंतु आताच्या सरकारने हे अनुदान बंद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, आपले शेतकरी जगातील मोठ्या देशांशी स्पर्धा कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
माथाडी संघटनेला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कामगारांना न्याय मिळवून देणारी अशी संघटना देशात नाही. आता झाडावर बांडगुळे वाढल्याप्रमाणे काही संघटना झाल्या असून ते कामगारांना न्याय देऊ शकत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, आपली माणसे विधानसभेवर पाठवा, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही माथाडी व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार यांनी खूप सहकार्य केल्याचे सांगितले. माथाडी नेते व जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे व आमदार नरेंद्र पाटील यांनी कामगारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)