देशातील सर्वांना ‘अच्छे दिन’!

By admin | Published: May 26, 2015 02:23 AM2015-05-26T02:23:42+5:302015-05-26T02:23:42+5:30

देश भ्रष्टाचार आणि घोटाळामुक्त झाला आहे. ज्यांनी ६० वर्षांच्या राजवटीत देशाला लुटले अशा घोटाळेबाजांसाठी ‘बुरे दिन’ आले आहेत,

Good days in the country! | देशातील सर्वांना ‘अच्छे दिन’!

देशातील सर्वांना ‘अच्छे दिन’!

Next

मोदींचे रिपोर्ट कार्ड : आम्ही आलो म्हणून देश वाचला!
नागला चंद्रभान (मथुरा) : देश भ्रष्टाचार आणि घोटाळामुक्त झाला आहे. ज्यांनी ६० वर्षांच्या राजवटीत देशाला लुटले अशा घोटाळेबाजांसाठी ‘बुरे दिन’ आले आहेत, असे रोखठोक बजावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मथुरेत सोमवारी रालोआ सरकारच्या पहिल्या वर्षाचा लेखाजोखा (रिपोर्ट कार्ड) सादर केला.
संपुआ सरकारला आणखी एक वर्ष मिळाले असते तर देश बुडाला असता, असे सांगत मोदींनी यापूर्वीच्या संपुआ सरकारवर जोरदार हल्ला केला. राजकीय नेत्यांचे जावई किंवा पुत्राचा एखाद्या घोटाळ्यात समावेश असल्याच्या कोणत्याही कथा आता उरल्या नाहीत. काही लोक त्रस्त झाले आहेत. सर्वांना ‘अच्छे दिन’ आले असताना स्वत:साठी मात्र ‘बुरे दिन’ आल्यामुळे ते त्रस्त आहेत.
ते लोक आता ओरडू लागले आहेत. कारण ६० वर्षे दिल्लीच्या राजकीय कॉरिडोरमध्ये केवळ त्यांचाच आवाज ऐकला जात होता. त्यांच्या मर्जीनुसार देश चालत होता. गेली अनेक वर्षे देशाला लुटणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येण्याची हमी मी दिलेली नव्हती. आम्ही ज्या पद्धतीने देश चालवत आहोत, ते पाहता त्यांना आणखी ‘बुरे दिन’ येतील. त्यांचा त्रास आणखी वाढेल. तुमचे पैसे कुणीही लुटणार नाही, अशी ग्वाही देत मोदींनी येथे जाहीर सभेत जनतेच्या भावनेला हात घातला. मथुरेला लागून असलेल्या दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मगावी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रालोआ सरकारने वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरात २०० सभांचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात मोदींच्या सभने झाली.
मोदींनी एक तासाच्या भाषणात गरीब आणि शेतकऱ्यांचे समर्थन करणारी भाषा वापरत अनेकदा टाळ्या घेतल्या. मात्र त्यांनी वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबत किंवा ‘वन रँक वन पेन्शन’ यासारख्या मुद्यावर शब्दही उच्चारला नाही. (वृत्तसंस्था)

तुलना घोटाळ्यांची...
मोदी म्हणाले की, गेली अनेक वर्षे देशाला महात्मा गांधी, लोहियाजी आणि दीनदयालजी या तीन थोर नेत्यांच्या विचारांनी आकार दिला. त्यामुळेच मी वर्षपूर्तीची कामगिरी मांडण्यासाठी दीनदयाल धामची निवड केली आहे. यापूर्वीचे सरकार रिमोट कंट्रोलवर चालत होते. दररोज घोटाळे आणि भ्रष्टाचार समोर येत होता. गेल्या वर्षभरात तुम्ही एखाद्या घोटाळ्याचे नाव ऐकले आहे काय? कोणते लागेबांधे, कोणता रिमोट कंट्रोल बघितला आहे काय? असा सवालही त्यांनी केला. संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला होता. ते वाईट दिवस संपले की नाही? आमच्या सरकारने देशाची लूट थांबविली आहे. मी देशाचा ‘प्रधान संत्री, प्रधान सेवक आणि प्रधान विश्वस्त’ आहे. मी देशाच्या संसाधनांची लूट कदापि होऊ देणार नाही.

काय केले आणि करणार...
थेट बँक खात्यात गॅस सबसिडी, अटल पेन्शन योजना, जीवन रक्षा विमा, अपघात विमा योजना, जनधन योजनांनी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
पुढील तीन वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याला सॉईल हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. पाच वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याला २४ तास वीज, मुबलक पाणी आणि स्वस्त दरात योग्य बियाणे देण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.
कालबाह्य कायदे मोडित काढण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि येत्या काही दिवसांत १३०० कायदे संपुष्टात आणले जाणार आहेत.

शेतकऱ्यांचे आत्महत्येचे राजकारण नको
गेल्या ६० वर्षांमध्ये तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तीन लाख असो की एक शेतकरी. त्यांच्या आत्महत्येचे राजकारण करायला नको. आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सर्वांनी मिळून समस्येवर तोडगा काढायला हवा. युरियाचा काळाबाजार आणि उद्योगांमध्ये त्याची होणाऱ्या चोरीला आळा घातला गेला आहे. युरियामध्ये कडूनिंबाचा थर चढविण्यात आल्यामुळे युरियाचा शेतीखेरीज अन्य कामासाठी वापर करता येणार नाही. जनधन योजना आणल्यामुळे मनरेगासारख्या योजनांतर्गत गरिबांना दिला जाणारा पैसा दलांलाच्या हाती पडणार नाही. थेट त्यांच्या खात्यात जमा होईल. घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता, तो थांबला आहे.

सूट-बूट की सरकारला उत्तर
मोदींचे सरकार श्रीमंत आणि उद्योगपतींसाठी काम करणारे ‘सूट बूट की सरकार’ असल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढताना मोदींनी गरिबांसाठी सरकारने सुरू केलेल्या जीवन रक्षा विमा, अटल निवृत्ती योजनांचा उल्लेख केला. छोट्या व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करवून देण्यासाठी मुद्रा बँक तयार करण्यात आली आहे. बडे उद्योगपती नव्हे तर छोटे व्यावसायिकच सर्वाधिक रोजगार उपलब्ध करवून देतात, असेही ते म्हणाले.

सत्तेचा चक्रव्यूह भेदला
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मी देशाच्या तिजोरीला कोणत्याही हाताचा (पंजा) स्पर्श होऊ देणार नाही, असे वचन दिले होते. दिल्लीच्या सत्तावर्तुळात अनेक सत्ताकेंद्रे निर्माण झाली होती. अभिमन्यूला चक्रव्यूहाची आठ वर्तुळे भेदावी लागली, येथे शंभरावर वर्तुळे होती. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अशी शेकडो वर्तुळे भेदली गेली आहेत. दलालांची आणि लागेबांध्याची संस्कृती संपुष्टात आली.

रुपया लाभार्थींच्या हाती...
दिल्लीत मंजूर झालेल्या एक रुपयापैकी केवळ १५ पैसे खेड्यांमध्ये पोहोचतात, असे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे. खऱ्या लाभार्थींपर्यंत पूर्ण शंभर पैसे पोहोचविण्याची व्यवस्था आमच्या सरकारने केली आहे. विरोधकांनी मोदी सरकार कॉर्पोरेट समर्थक आणि गरीबविरोधी आहे, असा प्रचार चालविल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आरोप फेटाळत सरकारमध्ये पारदर्शकता असल्याचे सांगितले.

 

Web Title: Good days in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.