'देश में अच्छे दिन आ गए हैं' : भाजपा अध्यक्ष अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 07:20 AM2017-09-08T07:20:02+5:302017-09-08T07:25:44+5:30
आमच्या पार्टीने अच्छे दिन येतील असं सांगितलं होतं, अच्छे दिन आले आहेत असं भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत.
भुवनेश्वर, दि. 8 - आमच्या पार्टीने अच्छे दिन येतील असं सांगितलं होतं, अच्छे दिन आले आहेत असं भाजपा अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत. ''2014 पासून अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला जनादेश दिला, या वरून देशाच्या झपाट्याने होणा-या विकासाची लोकांच्या मनावर छाप पडली असल्याचं दिसतं'' असं ते म्हणाले.
''अच्छे दिन आले आहेत, अनेक जण त्याचा अनुभव घेत आहेत. 2014 पासून भाजपाला अनेक राज्यांमध्ये मोठा जनादेश मिळाला आणि विधानसभा निवडणुकांत विजय मिळवला. जनादेशापेक्षा मोठं प्रमाणपत्र कोणतंही नाही. उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,जम्मू-काश्मीर,गोवा,मणिपूर,आसाम,हरियाणा,झारखंडचे विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे लोक अच्छे दिनचा अनुभव घेत असल्याचं स्पष्ट होतं.'' असं अमित शहा म्हणाले. ओडिसाच्या तीन दिवसाच्या दौ-यावर असलेले अमित शहा एका कार्यक्रमात बोलत होते.
''वन रॅंक वन पेन्शन योजना,मुद्रा बॅंक, शौचालय, उज्ज्वला योजनेच्या फायद्यामुळे कोट्वधी लोक अच्छे दिनचा अनुभव घेत आहेत. सातव्या वेतन आयोगामुळेही अनेक जणांना फायदा झाला आहे. प्रभावीपणे नियंत्रित केलेल्या महागाईने अनेकांदा दिलासा मिळाल्यामुळे अच्छे दिनचा अनुभव लोकांनी घेतला आहे'' असं शहा म्हणाले.
अमित शहा झाले लेखक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे खंड प्रकाशित होत असतानाच, आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही लेखकांच्या रांगेत येऊन बसत आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. १०) दुपारी साडेचार वाजता पुण्यात होत आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होईल. पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही आवृत्त्यांचे प्रकाशन शहा यांच्याच हस्ते होणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने हे पुस्तक प्रकाशित केले असून, भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी, हे या पुस्तकाचे नाव आहे. त्यात भाजपाच्या धोरणाची चिकित्सा केली असून, कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना बरोबरच सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी पक्षाची ध्येयधोरणे समजावित या हेतूने शाह यांनी पुस्तकाचे लेखन केले असल्याची माहिती दिली. प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी असतील. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख उपस्थित असतील. प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे व निमंत्रक योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली.