कुसुमाग्रज उद्यानाला येणार ‘अच्छे दिन’
By Admin | Published: January 12, 2016 11:16 PM2016-01-12T23:16:32+5:302016-01-12T23:18:03+5:30
नूतनीकरणाचा प्रस्ताव : सव्वा दोन कोटींच्या कामांना मंजुरी
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने पंचवटीत गोदाकाठी महापालिकेने उभारलेल्या काव्य उद्यानाचे दुष्टचक्र संपण्याची चिन्हे दिसत असून, उद्यानाला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेत नूतनीकरण व सुशोभिकरणासाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली आहे.
विद्यमान उपमहापौर गुरुमित बग्गा हे स्वीकृत सदस्य असताना त्यांच्या संकल्पनेतून पंचवटीत गोदाकाठी ५९६० स्क्वेअर मीटर क्षेत्रात कुसुमाग्रज काव्य उद्यान साकारले होते. कुसुमाग्रजांच्या कवितांच्या शिळा, कारंजा, पाथवे आदि आकर्षण काही काळ राहिले; परंतु कालांतराने उद्यानाच्या देखभाल-दुरस्तीकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले. कुसुमाग्रज उद्यान एक प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले, शिवाय त्याठिकाणी अवैध धंदेही सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांकडून उद्यानाची साफसफाई केली जायची, त्यानंतर वर्षभर त्याकडे कुणी ढुंकूनही पाहायचे नाही.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही दोनवेळा उद्यानाला भेट देऊन पाहणी केली होती आणि उद्यानाच्या नूतनीकरणाचे व सुशोभिकरणाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनाला पत्र लिहून सुशोभिकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने सुशोभिकरण व नूतनीकरणासाठी २ कोटी २४ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला असून मे. ओरीजीन आर्किटेक्ट्सच्या अपेक्षा कुटे यांनी त्याचे डिझाईन बनविले आहे. त्यामध्ये बांधकामावरच सुमारे १ कोटी ९३ लाख रुपये खर्च होणार असून, उद्यानविषयक कामांसाठी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला
आहे. सदर कामाच्या जाहीर निविदा मागविल्या जाणार आहेत. त्यापूर्वी उद्यानाची ८० टक्के जागा ही पूरनियंत्रण रेषेत रेड आणि ब्ल्यू लाइनमध्ये असल्याने निरीच्या निर्देशाप्रमाणे नगररचना आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामाला लवकरात लवकर गती देऊन येत्या २७ फेब्रुवारीला कामांचे भूमिपूजन करण्याचा विचार सत्ताधारी गोटात सुरू आहे.(प्रतिनिधी)