निवडणुकीमुळे चार राज्यांत आमदारांसाठी ‘अच्छे दिन’
By admin | Published: June 2, 2016 03:09 AM2016-06-02T03:09:20+5:302016-06-02T03:09:20+5:30
राज्यसभेच्या ४ जागांसाठी वाढलेली चुरस पाहता, चार राज्यांमधील आमदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. आमदारांना वळते करण्यासाठी मोठी बोली लावली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
राज्यसभेच्या ४ जागांसाठी वाढलेली चुरस पाहता, चार राज्यांमधील आमदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. आमदारांना वळते करण्यासाठी मोठी बोली लावली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. या निवडणुकीत विविध पक्ष आणि राजकीय वर्तुळात असलेले संबंध, तसेच आमदारांच्या संख्याबळावरून लावले जाणारे डावपेच कसोटीला उतरणार असे दिसते.
नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हरियाणा, झारखंड, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये हे चित्र दिसत असून, निवडणुकीची रंगत वाढली आहे. भाजपाने हरियाणा, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये संख्याबळाच्या तुलनेत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा जुगार खेळला आहे. काँग्रेसनेही कर्नाटकमध्ये तिसरी जागा पटकाविण्यासाठी रिअल इस्टेट सम्राट के. सी. राममूर्ती यांना उमेदवारी देत कंबर कसली.
हरियाणात तर काट्याची चुरस शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत. ९० सदस्यीय विधानसभेत ४७ आमदार असलेल्या भाजपाने केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्र सिंग यांना उमेदवारी दिली आहे.
दुसरीकडे मीडिया सम्राट सुभाषचंद्र यांनी ओमप्रकाश चौटाला यांच्या आयएनएलडीचे १९, बसपा आणि अकाली दलाच्या प्रत्येकी एक, तसेच ५ अपक्षांच्या समर्थनाच्या बळावर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. १७ आमदार असलेल्या काँग्रेसने उमेदवार उभा केला नसला, तरी ज्येष्ठ वकील आर. के. आनंद हे काँग्रेसशी निकटस्थ मानले जातात. स्वत: चौटाला यांनीही त्यांना समर्थनाचे आश्वासन दिले आहे.
८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपाकडे ४५ आमदार असून, केवळ एक उमेदवार निवडून आणण्याची क्षमता असताना, या पक्षाने मुख्तार अब्बास नकवी आणि महेश पोद्दार यांना उभे केले आहे. हेमंत सोरेन यांचे बंधू वसंत सोरेन यांचा पराभव हाच भाजपाचा हेतू दिसून येतो.
उत्तराखंडमधील एकमेव जागेवर भाजपाला विजयाची खात्री नसतानाही, या पक्षाने काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांवर डोळा ठेवत गीता ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदीप तामता यांची अडचण वाढली आहे. त्यामुळे ११ जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत उत्तराखंडच्या आमदारांना ‘चांगले’ दिवस येतील.