खासदारांना आता अच्छे दिन; वेतन आणि भत्ते होणार दुप्पट
By admin | Published: November 3, 2016 06:42 AM2016-11-03T06:42:13+5:302016-11-03T06:42:13+5:30
खासदारांचे वेतन व भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संसदेच्या या अधिवेशनात संमत होऊ शकतो.
नवी दिल्ली : खासदारांचे वेतन व भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संसदेच्या या अधिवेशनात संमत होऊ शकतो. खासदारांना १०० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला असून, त्यामुळे खासदारांचे मूळ वेतन एक लाख रुपये होईल.
खासदारांचे वेतन वाढविण्याशी संबंधित संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशींना पंतप्रधान कार्यालयाने सहमती दर्शविल्याचे समजते. राष्ट्रपतींचे वेतन दरमहा पाच लाख रुपये, तर राज्यपालांचे वेतन दरमहा अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. राष्ट्रपतींना सध्या दीड लाख रुपये, तर राज्यपालांना १ लाख १० हजार रुपये एवढे वेतन मिळते.
शिफारशी अमलात आल्यास खासदारांचे वेतन दरमहा एक लाख रुपये होईल. त्यांचे भत्तेही वाढणार आहेत. मतदारसंघ प्रवास भत्ता व इतर भत्त्यांपोटी त्यांना दरमहा ९० हजार रुपये मिळतील. खासदारांना वेतन आणि भत्ते मिळून सध्या दरमहा १ लाख ९० हजार रुपये मिळतात. वेतनवाढीनंतर ही रक्कम २ लाख ८० हजार रुपये होईल. या पूर्वी खासदारांना २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळत होते. ते वाढून ३५ हजार रुपये होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)