सुशासन आणि लाभार्थ्यांनी दिला भाजपला विक्रमी विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:11 AM2022-03-11T06:11:35+5:302022-03-11T06:12:17+5:30
राष्ट्रीय स्तरावर आप बनू शकतो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला पर्याय, हाती आलेला विजय काँग्रेसने आपसातील लढाईने दूर लोटला, १९८५ नंतर यूपीत एका पक्षाचे पुन्हा सरकार
- शरद गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढण्याची नवीन परिभाषा लिहिली तर आम आदमी पार्टीने सुशासनाला मुख्य निवडणूक मुद्दा बनविला. सर्वाधिक नुकसान काँग्रेसला झाले तर सर्वाधिक फायदा भाजप व आपचा झाला.
पाचही राज्यांतील निकाल ऐतिहासिक राहिले आहेत. १९८५ नंतर प्रथमच उत्तर प्रदेशात एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा निवडून आलेले आहे. १९९९ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर उत्तराखंडमध्येही प्रथमच एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर येत आहे. पंजाबमध्ये प्रथमच अकाली दल व काँग्रेसशिवाय अन्य एखाद्या पक्षाचे सरकार सत्तेत येत आहे. गोवा व मणिपूरमध्येही भाजप आपली सरकारे वाचविण्यात यशस्वी झाले आहे.
उत्तराखंडमध्ये ७० टक्के जागा जिंकल्या तरी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव होणे याचा अर्थ भाजपला मिळालेला विजय राज्य सरकारांच्या प्रदर्शनामुळे नव्हेतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला, असा काढला जात आहे.
उत्तर प्रदेशात जाट, ब्राह्मण यांच्याबरोबरच कुर्मी, मौर्य, राजभर, चौहान यासारख्या जाती व बेरोजगार युवकांची नाराजी असतानाही भाजपने जोरदार यश मिळविले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या रॅलींमध्ये जसा उत्साह होता, तसा उत्साह सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या रॅलींमध्ये होता.
केंद्र व राज्य सरकारांनी चालविलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांनी उत्तर प्रदेशात अशी काही ‘व्होट बँक’ उभी केली की, त्यावर ना जातीय समीकरणाचा परिणाम झाला ना धर्माशी संबंधित भावनात्मक मुद्द्यांचा.
अंतर्गत कलहाने नाव बुडाली
पंजाब व उत्तराखंडच्या काँग्रेसमधील अंतर्गत कहलामुळे ही स्थिती झाली. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, माजी अध्यक्ष सुनील जाखड व मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यातील मतभेदांनी पंजाबमध्ये काँग्रेसची नाव बुडविली. तर उत्तराखंडमध्ये माजी अध्यक्ष प्रीतम सिंह व केंद्रीय प्रभारी देवेंद्र यादव यांच्या हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हरीश रावत एवढे नाराज झाले की, त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती. ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतरही मतभेद दूर झाले नव्हते.
राष्ट्रीय राजकारणावर परिणाम
राष्ट्रीय राजकारणात आम आदमी पार्टी हळूहळू काँग्रेसची जागा घेत आहे का, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पंजाबमध्ये पक्षाला ४२ टक्के मते मिळाली तर उत्तराखंडमध्ये एकही जागा वाट्याला आली नसली तरी ३.३७ टक्के मते मिळाली आहेत. गोव्यात ७ टक्के मते घेऊन दोन जागा जिंकल्या आहेत.