आनंदाची बातमी! भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, रिकव्हरी रेट ९५.१२ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 05:17 PM2020-12-15T17:17:21+5:302020-12-15T17:22:34+5:30
CoronaVirus News : सध्या देशात कोरोनाचे फक्त ३,३९,८२० अक्टिव्ह रुग्ण आहेत.
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ९९ लाखांच्या पुढे गेली आहे. यातच आपल्या कोविड -१९ विरुद्धच्या लढाईतील हा महत्त्वाचा क्षण आहे. भारतात कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर वाढत आहे. सध्या देशात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९५.१२ टक्के आहे. जो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
कोरोनाची अॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त ३,३९,८२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाचे ३,३९,८२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ९४,२२,६३६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत १,४३,७०९ कोरोना संक्रमित लोकांचा मृत्यू झाला.
जगभरात कोरोनामुळे मोठे नुकसान झाला आहे. अमेरिकेसारख्या देशालाही आपल्या लोकांना कोरोनापासून वाचवता आले नाही. जवळजवळ सर्व देशांमधील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग 99 लाखाहून अधिक लोकांना झाला आहे. पण, आता भारतात कोरोनावर मात करण्यात येत आहे.
दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळू शकते, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी म्हटले आहे. अदार पूनावाला यांची कंपनी यूकेच्या ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाच्या सहकार्याने कोरोना लसीवर काम करत आहे. ही कंपनी कोव्हिशिल्ड लस तयार आहेत. एवढेच नव्हे तर इंडिया बायोटेक आणि फायझर इंडियादेखील देशात कोरोनावरील लस बनवण्याच्या शर्यतीत सहभागी आहेत.