गुड न्यूज ! देशातील सर्वच जिल्ह्यात 8 जानेवारीपासून कोरोना लसीचे ड्राय रन
By महेश गलांडे | Published: January 6, 2021 06:44 PM2021-01-06T18:44:57+5:302021-01-06T18:45:39+5:30
कोरोना लशीसंदर्भात भारत आता सातत्याने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्रालायाने मोठा निर्णय घेतला असून, आता 8 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लसीचे ड्राय रन सुरू करण्यात येणार आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी गुजरातच्या राजकोटमधील एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी देश जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी सज्ज असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता 8 जानेवारीपासून देशातील सर्वच जिल्ह्यांत कोरोना लसीचे ड्राय रन सुरू करण्यात येत आहे.
कोरोना लशीसंदर्भात भारत आता सातत्याने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्रालायाने मोठा निर्णय घेतला असून, आता 8 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लसीचे ड्राय रन सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 जानेवारी रोजी काही निवडक जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचे ड्राय रन करण्यात आले. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांचा समावेश होता.
Ahead of vaccine roll out, second dry run to take place on January 8 in all districts of the country.
— ANI (@ANI) January 6, 2021
कोरोना लसीकरणासाठी राज्यातील पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन यशस्वीरित्या घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथे ड्राय रनच्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाचे ड्राय रन घेण्यात आले. त्यानंतर, आता 8 जानेवारीपासून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कोरोना लसीचे ड्राय रन घेण्यात येईल. त्यामुळे, गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोना लशींसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आत्तापर्यंत 4 राज्यात ड्राय रन
आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता. या चारही राज्यांतून ड्राय रनचे चांगले रिझल्ट समोर आले होते. यानंतर आता सरकारने संपूर्ण देशातच हे ड्रय रन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्राय रनमध्ये काय होते?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार, ड्राय रनमध्ये राज्यांना आपली दोन शहरं निवडावी लागतील. या दोन शहरांत, लस शहरात पोहोचणे, रुग्णालयापर्यंत जाणे, लोकांना बोलावणे, यानंतर डोस देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे पालन, लसिकरण सुरू असल्याप्रमाणे केले जाईल. याच बरोबर सरकारने कोरोना लशीसंदर्भात तयार केलेल्या कोविन मोबाईल अॅपचेही ट्रायल होईल. ड्राय रननरम्यान, ज्या लोकांना लस दिली जाणार असते, त्यांना SMS पाठवला जाईल. यानंतर अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत लसीकरणावर काम केले जाईल.
पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना लस दिली जाणार -
सरकारने म्हटले आहे, की लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा ती पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. हे देखील निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रथम एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणार आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे -
देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २० ते २५ हजारांच्या आसपास आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या त्याहून अधिक आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूदर १.४५ टक्के इतका आहे.