गुडन्यूज! 'आधार'सह सर्व महत्वाचे डॉक्युमेंट्स एकत्रच अपडेट होणार, करावं लागेल फक्त एकच काम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 02:50 PM2023-03-08T14:50:51+5:302023-03-08T14:51:43+5:30
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे (MeitY) एक महत्वाचं काम सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आधार कार्डशी संबंधित आहे.
नवी दिल्ली-
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे (MeitY) एक महत्वाचं काम सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आधार कार्डशी संबंधित आहे. या अंतर्गत आवश्यक सरकारी कागदपत्रे आधारद्वारे ऑटो अपडेट होतील. मात्र, ही प्रक्रिया सुरू होण्यास थोडा वेळ लागू शकतो. सरकारला एक अशी सिस्टम तयार करायची आहे जी युझरला आवश्यक कागदपत्रांवर घराचा पत्ता बदलण्यासाठी कोणत्याही विभागाला किंवा मंत्रालयाला भेट देण्याची गरज भासणार नाही. नागरिकांनी त्यांच्या आधार कार्डमध्ये तपशील अपडेट केल्यावर हे काम आपोआप होईल.
आधारद्वारे ऑटो-अपडेट कसे काम करते?
अहवालात असे म्हटले आहे की ही प्रणाली प्रामुख्याने अशा यूझर्सना मदत करेल ज्यांनी डिजीलॉकरवर कागदपत्रे स्टोअर केली आहेत. डिजीलॉकर यूझर्सना लायसन्स, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे डिजिटली सेव्ह करण्याची परवानगी देतो.
आधार कार्डमध्ये केलेले बदल डिजीलॉकरमध्ये असलेल्या इतर कागदपत्रांवर देखील केले जातील. हे सर्व यूझरवर अवलंबून असेल की त्याला या फिचरची निवड करायची आहे की नाही.
सध्या असे म्हणता येईल की MeitY परिवहन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज यांसारख्या मर्यादित मंत्रालयांसोबत काम करत आहे. या प्रक्रियेत नंतर इतर विभागांचाही समावेश होऊ शकतो जेणेकरून यूझर्स पासपोर्ट इ. ऑटो अपडेट करू शकतील. यासाठी सरकार सॉफ्टवेअर API (Application Programming Interface) विकसित करेल.
ऑटो-अपडेट सिस्टमचे फायदे:
अहवालानुसार, आधारद्वारे डिजिलॉकर डॉक्युमेंट्सना अपडेट करण्यासाठी एक ऑटो-अपडेट प्रणाली तयार केली जाईल ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. यासोबतच बनावट कागदपत्रांची शक्यताही कमी होईल. हे अशा लोकांसाठी देखील खरे असेल जे त्यांच्या नोकरीमुळे वारंवार स्थान बदलत राहतात.