अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:21 PM2024-09-27T18:21:26+5:302024-09-27T18:21:43+5:30
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
Agniveer Scheme : केंद्र सरकारच्या अग्नीवीर योजनेत सहभागी झालेल्या अग्नीवीरांसाठी एक मोठी बातमी आहे. देशातील 'ब्रह्मोस एरोस्पेस' अग्निवीरांसाठी नोकऱ्या आरक्षित करणारी पहिली कंपनी बनली आहे. ब्राह्मोस एरोस्पेसने तांत्रिक विभागात 15 टक्के आणि प्रशासकीय आणि सुरक्षा विभागात 50 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ही घोषणा करण्यात आली आहे.
ब्रह्मोस एरोस्पेसने आपल्या तांत्रिक विभागात 15 टक्के आणि 200 हून अधिक उद्योग भागीदारांना ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BAPL) च्या गरजा पूर्ण करण्यासाठी 50% जागा अग्नीवीरांसाठी राखून ठेवण्यास सांगितले आहे. ब्रह्मोसमध्ये नियमित रोजगाराव्यतिरिक्त, अग्निवीरांना आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्टमध्येदेखील काम दिले जाईल, ज्यामुळे त्यांना नागरी करिअरमध्ये येण्यास वाव मिळेल.
ब्रह्मोसच्या मानव संसाधन आणि प्रशासन विभागाचे संचालक अनिल मिश्रा म्हणाले की, अग्निवीरांमध्ये कौशल्ये आणि कर्तव्याची भावना आहे, ज्यामुळे कंपनी आणि व्यापक संरक्षण क्षेत्राला त्याचा फायदा होईल. तर, ब्रह्मोस एरोस्पेसचे डेप्युटी सीईओ डॉ. संजीव कुमार जोशी म्हणाले की, मला विश्वास आहे की, सरकारच्या अग्निपथ योजनेचा हा पैलू इतर कॉर्पोरेट घराण्यांसाठी आणि व्यापक संरक्षण उद्योगासाठी फायदेशीर ठरेल.
ब्रह्मोस एरोस्पेस कंपनी
ब्रह्मोस एरोस्पेस ही भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPO Mashinostroyenia यांचा संयुक्त उपक्रम आहे. कंपनीची स्थापना 1998 मध्ये झाली आणि तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. कंपनीत भारताचा 70 टक्के हिस्सा आहे, तर रशियाचा 30 टक्के हिस्सा आहे.
अग्निवीरांना कुठे-कुठे मिळणार आरक्षण?
केंद्र सरकारने BSF, CRPF, CISF आणि ITBP मध्ये माजी अग्नीवीर जवानांसाठी 10 टक्के पदे राखीव ठेवली आहेत. त्याचबरोबर माजी त्यांना शारीरिक चाचणी आणि वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. याशिवाय यूपी पीएससी भरतीमध्येही सूट देण्यात आली आहे.