रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वंदे भारतसह 'एसी चेअर कार' चे भाडे २५ टक्के घटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 05:54 AM2023-07-09T05:54:56+5:302023-07-09T05:55:17+5:30
अल्प प्रतिसाद मिळालेल्या गाड्यांमध्ये होणार लागू
नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. रेल्वेने 'वंदे भारत 'सह सर्व गाड्यांतील एसी चेअर कार (सीसी) व एक्झिक्युटिव्ह क्लासेसच्या (ईसी) भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे
गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांतील वरील वर्गांना ५० टक्क्यांहून कमी प्रवासी मिळाले, त्या गाड्यांना ही सवलत त्वरित लागू केली जाणार असून, यात अनुभूती आणि विस्टाडोम डबे असलेल्या गाड्यांचाही समावेश असेल, असे रेल्वे मंडळाच्या एका आदेशात म्हटले आहे. सीसी, ईसी वर्गाचे भाडे ठरविण्यात येणार आहे. रेल्वेतील सोयीसुविधांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.
कोणत्या गाड्यांना लागू असेल सूट ?
अनुभूती आणि विस्टाडोम डब्यांसह वातानुकूलित आसन सुविधा असलेल्या सर्व रेल्वेच्या एसी चेअर कार व एक्झिक्युटिव्ह क्लासेससाठी ही योजना असेल
मूळ भाड्यावर कमाल २५ टक्क्यांची सूट दिली जाईल. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, वस्तू व सेवा कर यासारखे इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जाईल.
सीसी व ईसीतील किती जागा आरक्षित झाल्या आहेत या आधारावर एखाद्या किंवा सर्व वर्गात तसेच संपूर्ण प्रवास किंवा दरम्यानच्या एखाद्या टप्प्यासाठी सवलत दिली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.