सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गुड न्यूज, देशातील कुठल्याही बँकेतून मिळणार ईपीएफओची पेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 06:55 AM2024-09-05T06:55:27+5:302024-09-05T06:55:27+5:30
EPFO Pension: कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) देण्यात येणारी ‘ईपीएस-९५ पेन्शन’ येत्या जानेवारीपासून देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळू शकेल, अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी केली.
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) देण्यात येणारी ‘ईपीएस-९५ पेन्शन’ येत्या जानेवारीपासून देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळू शकेल, अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी केली.
मांडविया यांनी केंद्रीकृत पेन्शन अदायगी प्रणालीच्या (सीपीपीएस) प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मांडविया हे ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे चेअरमनही आहेत. ‘सीपीपीएस’द्वारे कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन वितरित करणे शक्य होईल.
ईपीएफओच्या ७८ लाखांपेक्षा अधिक ईपीएस-९५ पेन्शनधारकांना याचा लाभ होईल. या प्रणालीमुळे पेन्शन अदायगी आदेश एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थलांतरित करण्याची गरज राहणार नाही. त्याशिवाय संपूर्ण देशात कुठूनही पेन्शन निर्वेधपणे मिळण्याची सोय नव्या प्रणालीत आहे. पेन्शन सुरू करतेवेळी सत्यापनासाठी बँकेच्या शाखेत जाण्याचीही गरज नव्या प्रणालीमुळे राहणार नाही, तसेच पेमेंट जारी होताच तत्काळ पेन्शनधारकाच्या खात्यावर जमा होईल.