खुशखबर! सायबर सिक्युरिटीमध्ये नोकऱ्यांचा सुकाळ
By admin | Published: November 2, 2016 12:21 PM2016-11-02T12:21:50+5:302016-11-02T12:21:50+5:30
सायबर सिक्युरिटी देणाऱ्या तज्ज्ञांच्या मागणीत वाढ झाली असून, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 2 - गेल्या काही काळात इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मोठमोठ्या कंपन्यांपासून वैयक्तिक पातळीवरही इंटरनेटचा वापर अपरिहार्य झालाय. मात्र इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबच सायबर सिक्युरिटीचे आव्हानही उभे राहिले आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी देणाऱ्या तज्ज्ञांच्या मागणीत वाढ झाली असून, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये नोकऱ्यांचा सुकाळ राहणार आहे.
मोठ्या आणि लहान कंपन्यांसोबतच छोटे छोटे स्टार्ट अप उद्योजक देखील आता सायबर सिक्युरिटी कर्मचाऱ्याची नियुक्ती करू लागले आहेत. कंपन्यांबरोबरच अनेक ग्राहक स्वत:चा महत्त्वपूर्ण डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी डाटा सिक्युरिटी इंजिनिअरची मदत घेत आहेत. त्यामुळे डाटा सिक्युरिटीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे तेलंगणा माहिती तंत्रज्ञान असोसिएशनचे (टीआयटीए) संस्थापक सुदीप कुमार माक्थाला यांनी सांगितले.
सायबर सिक्युरिटी पदवी असणाऱ्यांच्या पगाराची सरासरीही इतर क्षेत्रातील इंजिनिअर्सपेक्षा अधिक आहे. सायबर सिक्युरिटीची पदवी घेणाऱ्या फ्रेशर्सना 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तर अन्य क्षेत्रात मिळणाऱ्या पगाराची सरासरी ही 2.5 लाख ते 3.6 लाख एवढी आहे.
"सायबर सुरक्षेसाठी स्वयंचलित सायबर सिक्युरिटी यंत्रणा उपलब्ध असली तरी ती सिक्युरिटी तज्ज्ञासाठी पर्याय ठरू शकत नाही. कारण सायबर गुन्हेगारांकडून अललेला धोका दररोज नवनव्या रूपात आपल्या समोर येत असतो. तो मालवेअर किंवा व्हायरसच्या स्वरूपात असू शकतो. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने नजर ठेवावी लागते," असे एका आघाडीच्या आयटी कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.