खुशखबर..! महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होणार मान्सून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:10 PM2018-05-18T18:10:48+5:302018-05-18T18:10:48+5:30
वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आज जाहिर केले आहे
पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन यंदाच्या वर्षी केरळमध्ये वेळेआधीच होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आज जाहिर केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून धडकणार आहे. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर चार दिवसांत राज्यात मान्सून धडकण्याची चिन्हे आहेत. 23 मे रोजी अंदमानला मान्सून दाखल होणार आहे. अंदमान ते तळ कोकण हा मान्सूनचा हा प्रवास 17 ते 21 दिवसांचा असतो. पण बरेचदा वादळी स्थीतीमुळं श्रीलंकेमध्ये अडकून राहतो.
मान्सून दरवर्षी सर्वसामान्यपणे दि. 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र, यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरण्याची चिन्हे दिसत असून, तो वेळापत्रकाच्या तब्बल 7 दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षी केरळमध्ये वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. केरळ किनारपट्टीजवळ दि. 25 ते 27 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, त्या दरम्यान तेथे मुसळधार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे.