खूशखबर ! मान्सून अंदमानात दाखल, केरळमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 01:08 PM2018-05-25T13:08:20+5:302018-05-25T13:12:00+5:30
मान्सून अंदमानात दाखल झाला आहे
मुंबई - उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या सर्वांसाठी हवामान विभागानं एक खूशखबर दिली आहे. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत बंगालच्या उपसागरातील अन्य भागातही मान्सून धडकणार आहे. लवकरच मान्सून केरळकडे वाटचाल करेल. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तो लवकरच कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करेल, अशी माहितीही हवामान विभागानं दिली आहे.
दरम्यान, 27 मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 ते 28 मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राजस्थानाचा काही भाग, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरातील काही भाग तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातील एक ते दोन ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.
भारतीय हवामान विभागानं पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.