चित्रपट रसिकांसाठी गुड न्यूज, १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहे 'हाऊसफुल्ल'
By जयदीप दाभोळकर | Published: January 31, 2021 01:00 PM2021-01-31T13:00:18+5:302021-01-31T13:04:11+5:30
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून एसओपी जाहीर
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चित्रपटगृहे मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ठराविक प्रेक्षकांच्या संख्येसह चित्रपटगृहे सुरू करण्यात आली होती. परंतु आता १ फेब्रुवारीपासून १०० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात एसओपी जाहीर केली असून १०० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांच्या आत आणि कॉमन एरियामध्ये प्रेक्षकांना ६ फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसंच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि प्रेक्षक बाहेर पडणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझर असणंदेखील बंधनकारक करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त चित्रपटगृहांमध्ये थुंकण्यास बंदी असेल. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणंदेखील बंधनकारक करण्यात आलं आहे. १ फेब्रुवारीपासून देशातील सर्व चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेसह सुरु होणार आहेत.
याव्यतिरिक्त पार्किग लॉट आणि चित्रपटगृहांच्या जवळपास गर्दी नियंत्रित करण्यासही सांगण्यातआलं आहे.
पार्किगमध्येदेखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लिफ्टमध्येदेखील अधिक लोकांना प्रवेश देणं टाळण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत. याशिवाय कॉमन एरिया, लॉबी आणि शौचालयांमध्ये इंटरवलच्यावेळी गर्दी जमू नये याची चित्रपटगृहांना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच इंटरवलमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या जागेवरून न उठण्याच्या सूचनादेखील केल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त इंटरवलचा कालावधीदेखील मोठा असू शकतो.
यापूर्वी अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात सरकारनं देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवनगी दिली होती. त्यानंतर दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांनी ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यास मान्यता दिली होती. तसंच मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग अशा गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या होत्या.