खूशखबर! येत्या 10 दिवसांत पेट्रोल, डिझेल 5-6 रुपयांनी होणार स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 03:30 PM2020-03-11T15:30:29+5:302020-03-11T15:37:05+5:30
Petrol price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत जरी 35 डॉलर असली तरी देशातील दर हे इंडियन बास्केटवर ठरविले जातात. मात्र, इंडियन बॅरलची किंमत आताही 45 डॉलर प्रति बॅरल आहे, असे पेट्रोलियम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले.
नवी दिल्ली : सौदी अरेबियाने छेडलेल्या कच्च्या तेलाच्या किंमत युद्धाचा थेट फायदा काही प्रमाणात भारतीय वाहनचालाकांनाही होणार आहे. येत्या 10 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी कपात होण्याची शक्यता आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांनी कपात झाली होती. ही किंमत 35 डॉलर प्रति बॅरल झाली होती.
मात्र, याचा थेट लाभ भारतीय वाहनचालकांना झालेला नाही. यावर इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलियम कंपन्या हे दर 15 दिवसांचा आढावा घेवून ठरवितात. यामुळे पुढील काही दिवसांत देशातील इंधनाच्या किंमती कमी होतील.
यामुळे इंधनाच्या दरांमध्ये कपातीसाठी वाहनचालकांना वाट पहावी लागणार आहे. असे झाल्यास पुढील काळात इंधानाच्या किंमती 5 ते 6 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत जरी 35 डॉलर असली तरी देशातील दर हे इंडियन बास्केटवर ठरविले जातात. मात्र, इंडियन बॅरलची किंमत आताही 45 डॉलर प्रति बॅरल आहे, असे पेट्रोलियम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. यामुळेही पेट्रोलियम कंपन्यांना दर कपात करण्यात अडचणी येणार आहेत. कंपन्यांना डॉलर खरेदी करण्यासाठी आणि आयात करण्यासाठी जादा रुपये खर्च करावे लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Petrol prices: ५० रुपये लिटरने मिळू शकतं पेट्रोल; चकित झालात?, मग कसं ते वाचाच!
पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले; आज किंमतीत कोणताही बदल नाही
याशिवाय सरकार कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील सीमाशुल्क वाढविण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही सरकारने दर कपातीचा फायदा ग्राहकांना मिळवून दिला नव्हता. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनुसार सरकारवर महागाईचा दबाव वाढत आहे. यामुळे जर सरकारने कर वाढविला नाही, तर त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळू शकतो.