खूशखबर! रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर केले कमी, आता द्यावे लागतील फक्त 'इतके' रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:09 PM2021-11-26T12:09:33+5:302021-11-26T12:12:13+5:30
कोरोना काळात रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीटांमध्ये वाढ करण्यात आली होती.
नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाने (Indian Railway) गुरुवारी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमती(Platform ticket price) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली होती. पण, आता गुरुवारी रेल्वेने घेतलेल्या निर्णयानंतर प्लॅटफॉर्म तिकीट पूर्वीप्रमाणेच 10 रुपये असेल.
मध्य रेल्वेने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात कपात केली. मध्य रेल्वेच्या अधिसूचनेनुसार कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता लक्षात घेऊन सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 50 रुपयांवरून कमी करुन 10 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी केल्यानंतर रेल्वेने देशभरातील प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला.
रेल्वेत पुन्हा मिळणार शिजवलेले अन्न
आता प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रेल्वेने पुन्हा ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाने परिपत्रक जारी करून दिली आहे. त्यानुसार, लवकरच रेल्वे पुन्हा ट्रेनमध्ये शिजवलेले जेवण देण्यास सुरुवात करणार आहे. मात्र, रेडी टू इट जेवणही मिळेल.
या गाड्यांमध्ये मिळेल सुविधा
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सध्या सर्व ट्रेनमध्ये पॅन्ट्रीची सुविधा दिली जाणार नाही. सध्या राजधानी, दुरांतो, शताब्दी, तेजस, गतिमान एक्स्प्रेस या गाड्यांमध्येच केटरिंग सेवा उपलब्ध असेल, ज्याअंतर्गत ताजे शिजवलेले जेवण ट्रेनमध्येच प्रवाशांना दिले जाईल. पण, हळूहळू ही सुविधा इतर गाड्यांमध्येही उपलब्ध होणार आहे.
विभागाकडून परिपत्रक
जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सामान्य रेल्वे सेवा पुनर्संचयित करणे, प्रवासी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन आणि देशभरातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि अशा इतर ठिकाणी कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, हे पाहता रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमध्ये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, रेडी टू इट सर्व्हिसही सुरू राहणार आहे.