गुडन्यूज : पगार, पेन्शन वाढणार; डीए झाला ५०%
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 06:10 AM2024-03-08T06:10:04+5:302024-03-08T06:11:24+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात गुरुवारी ४ टक्के वाढ केली. त्यामुळे हा भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्के होईल. विशेष म्हणजे, १ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, त्याचा १ कोटीपेक्षा अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. याशिवाय प्रवास भत्ता, कॅन्टीन भत्ता आणि प्रतिनियुक्ती भत्त्यात २५ टक्के वाढ करण्यात आली. विविध श्रेणीतील घरभाडे भत्ता २७ टक्के, १९ टक्के आणि ९ टक्क्यांवरून वाढवून अनुक्रमे ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के करण्यात आला आहे. तसेच ग्रॅच्युईटी लाभात २५ टक्के वाढ करत त्याची कमाल मर्यादा २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे.
‘उज्ज्वला’ सबसिडीला मुदतवाढ
उज्ज्वला योजनेत स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या ३०० रुपयांच्या सबसिडीला १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यावेळी घेतला.