गुड न्यूज: जुलैमध्ये बरसणार आनंदधारा; येत्या २४ तासांत १७ राज्यांत मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 08:31 AM2023-07-02T08:31:04+5:302023-07-02T08:31:17+5:30
देशाच्या बहुतांश भागांमध्ये जुलै महिना सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले.
नवी दिल्ली : देशभरात मान्सूनचा सरासरी पाऊस जूनपेक्षा जुलैत ‘सामान्य’ राहण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशाच्या ‘मान्सून कोर’ झोनमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळतात. त्याचवेळी देशाच्या बहुतांश भागांमध्ये जुलै महिना सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले.
जुलैत देशभरात मान्सूनची स्थिती सकारात्मक राहणार असली तरी वायव्य भारतातील पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सामान्य पातळीहून कमी पावसाची शक्यता आहे. काही भागांत हा चिंतेचा विषयही ठरू शकतो. मध्य भारत व लगतच्या दक्षिण प्रायद्वीप आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागांत तसेच ईशान्य व वायव्य भारतातील काही भागांत ‘सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस’ होण्याची शक्यता आहे. याउलट वायव्य, ईशान्य व आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील अनेक भागांत ‘सामान्यपेक्षा कमी’ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या २४ तासांत १७ राज्यांत मुसळधार
हवामान विभागाने या आठवड्यात जवळपास सर्व राज्यांत पावसाचा इशारा दिला असून, येत्या २४ तासांत मध्य प्रदेश-राजस्थानसह १७ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. उत्तराखंडमधील चमोली येथे शनिवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे बद्रीनाथ महामार्ग (एनएच - ७) बंद करावा लागला. महामार्ग प्राधिकरण दरडीचा ढिगारा हटवत आहे. दाेन दिवसांपूर्वी बद्रीनाथ महामार्ग १७ तासांसाठी बंद करण्यात आला होता.
या राज्यांत मुसळधार
राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक.
या राज्यांत कोरडे आकाश
छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांसह महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आकाश कोरडे राहील.