ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पडणार चांगला पाऊस, उत्तर, मध्य भारतात मात्र कमी प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:55 AM2021-08-03T09:55:54+5:302021-08-03T09:56:56+5:30
India Rain Update: ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये देशभरात सामान्य पातळीपेक्षा जरा अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
नवी दिल्ली : ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये देशभरात सामान्य पातळीपेक्षा जरा अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र उत्तर व मध्य भारतात काही ठिकाणी पाऊस सामान्य पातळीइतका किंवा त्यापेक्षा जरा कमी होईल, असे हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटले आहे.
पावसाची दीर्घकाळाची सरासरी ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये असेल, तर ती सामान्य पातळी समजली जाते. जून, जुलैमध्ये देशभरात पावसाने अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली होती. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्र, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस व पुरामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार होऊन काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
हवामान खात्याने म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये बहुतांश ठिकाणीका सामान्य पातळीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामान खाते ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला जाहीर करणार आहे.
जागतिक हवामानाचा परिणाम
-हवामान खात्याने सांगितले की, सध्याची जागतिक हवामान स्थिती लक्षात घेता, एल निनोचा प्रभाव प्रशांत महासागरामध्ये कायम राहणार आहे.
-मध्य व पूर्व विषुववृत्तामध्ये प्रशांत
महासागराचा जो भाग येतो, तिथे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
-हिंद महासागरातही बदलत्या हवामानाचा परिणाम जाणवणार आहे.