शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 06:55 AM2024-10-17T06:55:50+5:302024-10-17T06:56:32+5:30
आता काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : २०२५-२६च्या विपणन हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) १५० रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल २४२५ रुपये करण्यात आली आहे.
आता काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींविषयक कॅबिनेट समितीने एप्रिल २०२५-२६च्या विपणन हंगामासाठी सहा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल १३० ते ३०० रुपयांची वाढ केली.
हा विपणन हंगाम एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर त्यातील निर्णयांची केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना माहिती दिली.
विपणन हंगाम २०२५-२६ साठी रब्बी पिकांकरिता एमएसपी -
पीक नवा एमएसपी वाढ
गहू २४२५ १५०
सातू १९८० १३०
हरभरा ५६५० २१०
मसूर ६७०० २७५
मोहरी व रेपसीड ५९५० ३००
करडई ५९४० १४०
पीएम-आशा योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपये मंजूर -
पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) या योजनेसाठी केंद्र सरकारने ३५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.