नद्या, धबधबे, पश्चिम घाटाचे पारदर्शी दर्शन; मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोचना प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:57 AM2022-01-17T06:57:41+5:302022-01-17T06:59:12+5:30
प्रवाशांना बाहेर निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेता यावा. त्यांना निसर्गरम्य दृश्य टिपता यावी यासाठी याकामी रेल्वेनेही पुढाकार घेतला.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याद्वारे मुंबई ते गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट अशी दृश्ये प्रवासी आपल्या डोळ्यांत कैद करीत आहेत. याद्वारे मध्य रेल्वेने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या काळात २०,४०७ प्रवाशांची नोंद केली असून, २.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले.
प्रवाशांना बाहेर निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेता यावा. त्यांना निसर्गरम्य दृश्य टिपता यावी यासाठी याकामी रेल्वेनेही पुढाकार घेतला. हे करताना गाड्या आरामदायकदेखील कशा लाभदायक ठरतील यावर भर देण्यात आला.
विस्टाडोम डब्यांमध्ये काय आहे ?
काचेचे पारदर्शक छत
रुंद खिडक्या
एलईडी दिवे
फिरता येण्याजोगे आसन
पुशबॅक खुर्च्या
जीपीएस आधारित माहिती प्रणाली
मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन
इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे
दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे
सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट
व्ह्यूइंग गॅलरी
२०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला. अशा प्रकारचा डबा २६ जून
२०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये जोडण्यात आला. मुंबई-पुणे मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच १५ ऑगस्टपासून डेक्कन क्विनला जोडण्यात आला.
मुंबई - मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसने ७,७५४ प्रवाशांची नोंद करीत १.४० कोटी कमाविले आहेत.
मुंबई - पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेसने ७,१८५ प्रवाशांच्या नोंदीसह ५०.९६ लाख कमाई केली आहे.
डेक्कन क्विनने ५,४६८ प्रवाशांची नोंद करीत ४६.३० लाख उत्पन्न मिळविले आहे.