देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्ष पिकाला चांगला वाव : गायकवाड
By admin | Published: September 18, 2016 12:01 AM2016-09-18T00:01:55+5:302016-09-18T00:20:41+5:30
चर्चासत्र : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ
चर्चासत्र : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ
नाशिक : देशभरात होणार्या द्राक्षाच्या उत्पादनापैकी केवळ १० टक्केच द्राक्षांची परदेशात निर्यात होते, तर नव्वद टक्के द्राक्षांची देशांतर्गत विक्री केली जाते़ शेतकरी निर्यातक्षम द्राक्षासाठी जशी मेहनत घेतात तशीच मेहनत देशांतर्गत विक्रीसाठीच्या द्राक्षासाठी घेतल्यास शेतकर्यांना चांगले पैसे मिळू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले़ दादासाहेब गायकवाड सभागृहात ऑक्टोबर छाटणी या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़
गायकवाड म्हणाले की, परदेशात निर्यात करणारी द्राक्षांची गुणवत्ता ही चांगली असावी लागते़ अर्थात त्यासाठी काही देशांमध्ये चांगले वाण विकसित करण्यात आले असून, या वाणांची आयात करून आपणही निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करू शकतो़ तसेच परदेशात निर्यातीसाठी द्राक्षे कडक, गोड असणे गरजेचे असते़ शेतकर्यांनी द्राक्षांच्या उत्पादन घेताना प्रमाणित कंपन्यांच्याच किटकनाशकांचा वापर करणे गरजेचे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले़
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी सहसंचालक कैलास मोते, कृषी अधिकारी टी़ एऩ जगताप, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, प्रकल्प संचालक अशोकराव कांबळे, कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, आदि उपस्थित होते़ यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
या चर्चासत्राच्या उद्घाटनसत्रानंतर द्राक्षबागेतील रोग व्यवस्थापन, द्राक्षबागेतील विस्तार व मालाचे व्यवस्थापन, द्राक्षबागेतील कीड नियंत्रण, द्राक्षबागेतील जमीन, खत व्यवस्थापन व संजीवकांचा वापर या विषयांवर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ़ एस़ डी़ सावंत, डॉ़ ए़ के़उपाध्याय, डॉ़ आऱ जी़ सोमकुवर, डॉ़ एस़ डी़ रामटेके, डॉ़ दीपेंद्र सिंग यादव आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)