अलविदा, कलाम सर!
By admin | Published: July 29, 2015 03:10 AM2015-07-29T03:10:57+5:302015-07-29T03:10:57+5:30
आपली ‘शिक्षक’ हीच ओळख सर्वांनी लक्षात ठेवावी असे त्यांना वाटायचे. आज त्यांना ‘‘अलविदा, कलाम सर!’’ या शब्दांत निरोप देताना माझे मन जड झाले आहे.
- खा. विजय दर्डा
आपली ‘शिक्षक’ हीच ओळख सर्वांनी लक्षात ठेवावी असे त्यांना वाटायचे. आज त्यांना ‘‘अलविदा, कलाम सर!’’ या शब्दांत निरोप देताना माझे मन जड झाले आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे ८३ वर्षांचे जरी असले तरी त्यांच्यातील सळसळत्या तरुणाईने ते संध्याछायेत वावरत आहेत असे अजिबात वाटत नव्हते. ‘मिसाइल मॅन’ अशी ओळख असलेला हा माणूस आकाशातील एक तारा बनण्यापूर्वी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसमोर संसद कशी कृतिशील होईल यावरील भाषण देण्याची तयारी करीत होता. ‘निरोपाचा कार्यक्रम थोडक्यात आटपावा,’ या त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा असल्याचे लक्षात येते. या जगाचा निरोप घेताना त्यांनी आपल्याला हाच बोध दिला. शिकवणं ही त्यांची आवड होती आणि आपली ‘शिक्षक’ हीच ओळख सर्वांनी लक्षात ठेवावी असे त्यांना वाटायचे. आज त्यांना ‘‘अलविदा, कलाम सर!’’ या शब्दांत निरोप देताना जड झालेले माझे मन, त्यांच्या वेळोवेळी झालेल्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक व व्यक्तिगत प्रेमातून दिलेल्या अनेकानेक शिकवणींची आठवण करीत आहे.
त्यांची एक भेट जेवताना झाली. त्या वेळी मी त्यांना माझी ओळख स्वातंत्र्यसेनानी देशभक्ताचा मुलगा अशी करून दिली. तसेच राजकारणाऐवजी समाजकल्याण हाच माझ्या काळजीचा विषय असल्याचे सांगितले तेव्हा अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि राष्ट्रपतींशी निगडित असलेला सर्व तऱ्हेचा प्रोटोकॉल बाजूला सारून त्यांनी स्वत:ची प्लेट मला देऊ केली. त्यातून त्यांच्यातील विनम्रतेचे आणि स्वातंत्र्य चळवळीतील बलिदानाच्या भावनेचा सन्मान राखण्याचे दर्शन घडले होते. त्या क्षणानंतर ते केवळ संवेदनशीलता, प्रेमळपणा आणि मार्गदर्शकतेची मूर्तिमंत प्रतिमाच मला वाटत होते.
माझ्या यवतमाळ या मतदारसंघाविषयी त्यांनी मला अत्यंत खोदून खोदून प्रश्न विचारले. त्यानंतर क्षणभर थांबून ते म्हणाले, ‘मी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना भेटणार आहे, त्या वेळी आपण इतर प्रश्नांविषयी बोलू.’ त्यानंतर आम्ही काही दिवसांनीच राष्ट्रपती भवनात सगळे एकत्र जमलो होतो. तेव्हापासून गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यापासून सर्वच जण कलामसाहेबांच्या वर्गाचे विद्यार्थी होतो व आमच्या मतदारसंघातील आम्हा सर्वांना कलामसाहेबांच्या प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागली. कलाम सरांजवळ बहुतेक सर्वच मतदारसंघांची माहिती होती व त्यामुळे होमवर्क न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना फजितीला सामोरे जावे लागले होते. सुदैवाने मी तयारी करून गेलो असल्यामुळे बचावलो होतो. त्यानंतर कलामसाहेबांची यवतमाळला झालेली भेट केवळ अविस्मरणीयच होती.
अमोलकचंद महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंतीच्या सोहळ्यामुळे कलामसाहेब प्रभावित झाले होते. १९५६ साली
४० विद्यार्थ्यांसह सुरू झालेले हे महाविद्यालय या जिल्ह्यातील सर्वांत मोठे महाविद्यालय होईल असे भाकीत त्या वेळी पंडित नेहरूंनी केले होते. ते आज तंतोतंत खरे ठरले होते. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांनी या विभागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे शिक्षण मिळावे यासाठी जी दूरदृष्टी बाळगली होती ते पाहून कलामसाहेब भारावून गेले होते. ते काही काळ बाबूजींच्या पुतळ्यासमोर स्तब्ध बसून राहिले होते. त्यानंतर त्यांनी माझी आई- बाई - हिच्याशीही पारिवारिक गप्पा मारल्या होत्या.
अमोलकचंद महाविद्यालयाच्या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने त्यांना ‘आपणास कोणते संबोधन आवडेल,’ असा प्रश्न केला होता. त्यावर ‘मला प्रोफेसर म्हणा,’ असे उत्तर त्यांनी दिले होते. कलाम सर जेव्हा यवतमाळला आले तेव्हा त्यांची राष्ट्रपतिपदाची कारकिर्द अखेरच्या टप्प्यात होती. त्या वेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वत:चा ई-मेल आयडीदेखील दिला होता.
कलाम सरांनी भारताच्या राष्ट्रपतिपदाला गौरवान्वित केले होते हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. वरकरणी एकाकी वाटणारे कलामसाहेब,
राष्ट्रपती म्हणून कुणालाही सहज उपलब्ध होत होते. बड्या लोकांच्या
मेळाव्यात तरुण मंडळींना तेवढे स्थान नसायचे; पण कलामसाहेबांच्या कार्यक्रमात मात्र तरुणांना व्ही.व्ही.आय.पी.ची वागणूक मिळत असे. त्यांनी तरुण आणि वयस्क यांच्यातील दरी मिटवून टाकली होती.
शिक्षणाने जीवनात काय चमत्कार घडू शकतो याचे कलामसाहेब हे जिवंत उदाहरण होते. तुम्हाला एकदा योग्य शिक्षण मिळाले की तुमची मूळ ओळख तुमच्या प्रगतीला बाधा ठरू शकत नाही, हे त्यांनी दाखवून दिले होते. त्यामुळेच कलामसाहेब हे कोणत्याही कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने कमालीचे लोकप्रिय होते. त्यांचे शब्द हीच कृती होती. आज तरुणांना स्फूर्ती देऊ शकतील अशी मंडळी विरळ झाली असताना कलामसाहेबांचे जाणे ही राष्ट्रीय हानीच ठरली आहे. अलविदा, कलामसाहेब!