फोनवर दुसराच व्यक्ती ऐकतोय तुमचं खासगी संभाषण? Google चा संसदीय समितीसमोर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 02:18 PM2021-07-01T14:18:45+5:302021-07-01T14:20:26+5:30
लोकांच्या अधिकाराचे रक्षण करणे आणि सोशल मीडिया ऑनलाईन न्यूजचा गैरवापर रोखावा यासाठी संसदीय समितीने बैठकीचे आयोजन केले होते.
नवी दिल्ली – फोन, इंटरनेटवर प्रायव्हेसीवरून अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. तुमच्या फोनमधील डेटा हा केवळ तुमच्याकडेच असतो असं नाही. ज्या पद्धतीने भारतात इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे तसं लोकांच्या मनात आजही अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत आहेत. सध्याच्या डिजिटल युगात प्रायव्हेसीवरून अनेकदा संभ्रमाचं वातावरण असतं. त्याबद्दल आज मोठा खुलासा झाला आहे.
माहिती तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या संसदीय स्थायी समितीसमोर पहिल्यांदाच गुगलनं कंपनी युजर्सचा काही संवाद ऐकते असं कबूल केले आहे. फेसबुक आणि गुगलच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाचा गैरवापर या विषयावर माहिती तंत्रज्ञान विषयाची स्थायी समितीसमोर त्यांची बाजू मांडली. यावेळी गुगलच्या काही सेवांवर संशय असल्याचं संसदीय समितीनं म्हटलं. जेव्हा ओके गुगल करून जेव्हा गुगल असिस्टेंटला विचारलं जातं तेव्हा ते गुगलचे कर्मचारी ऐकतात का? गुगलनं याबाबत कर्मचारी ऐकू शकतात असं म्हटलं.
परंतु गुगल अधिकाऱ्यांनी मानलं की ते संवेदनशील गोष्टी ऐकू शकत नाहीत. त्यावर संसदीय समितीने कोणती बाब संवेदनशील आहे की नाही हे कसं ठरवलं जातं? हे विचारलं त्यानंतर समितीकडून आयटी मंत्रालयाच्या प्रतिनिधींना बोलवण्याचा निर्णय घेतला. सरकारने दिलेले सर्व दिशानिर्देश मानावे लागतील असं समितीने कंपन्यांना सांगितले. फेसबुकचे अधिकारी शिवनाथ ठुकराल आणि नम्रता सिंह यांनी समितीसमोर त्यांची बाजू मांडली. गुगलकडून अमर जैन, गितांजली दुग्गल यांनी म्हणणं मांडले.
लोकांच्या अधिकाराचे रक्षण करणे आणि सोशल मीडिया ऑनलाईन न्यूजचा गैरवापर रोखावा यासाठी संसदीय समितीने बैठकीचे आयोजन केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, फेसबुक, गुगलच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, सध्या डेटा सुरक्षेबाबत धोरणांमध्ये काही त्रुटी आढळून येत आहेत. लोकांचा खासगी डेटा आणि सुरक्षा यांच्यासाठी कडक धोरण निश्चित करावं लागेल. सोशल मीडियावर महिला युजर्सच्या सुरक्षेबाबत समितीचे अध्यक्ष थरूर यांनी चिंता व्यक्त केली. अनेक महिला खासदारांकडून तशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगामी काळात समितीची बैठक लवकरच होईल असं सांगण्यात आले आहे.