गूगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 04:20 AM2020-07-14T04:20:08+5:302020-07-14T06:42:57+5:30
सुंदर पिचाई हे भारतीयवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता.
नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असला तरी येथील बाजारपेठेबद्दल गुंतवणूकदारांमध्ये असलेले आकर्षण जराही कमी झालेले नाही. आयटी क्षेत्रातील गुगल ही बलाढ्य कंपनी भारतामध्ये १० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे.
गुगल कंपनीचा गुगल फॉर इंडिया हा व्यावसायिक प्रकल्प असून त्या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. सुंदर
पिचाई यांनी सांगितले की, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुगलने या देशात इतकी मोठी गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाबद्दलच्या धोरणामुळे गुगल कंपनीला मोठे पाठबळ मिळाले आहे.
सुंदर पिचाई हे भारतीयवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता.
मोदी यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुंदर पिचाई यांनी सोमवारी सकाळी संवाद साधला.
भारतीय उद्योग व शेतीला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसा फायदा करून देता येईल तसेच डेटा व सायबर सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजना या गोष्टींवर दोघांनी चर्चा केली.
डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा
व अन्य काही बाबींमध्ये गुगल भारतात
सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.