गुगल मॅपने पुन्हा दिला दगा, भरधाव कार कालव्यात कोसळली, ३ जण करत होते प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:43 PM2024-12-03T16:43:22+5:302024-12-03T16:43:35+5:30
Car Accident In Uttar Pradesh: गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्यावरून मार्गाक्रमण करत असलेली ही कार थेट कालव्यात पडली.
गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्यावरून मार्गाक्रमण करत असलेली ही कार थेट कालव्यात पडली. सुदैवाने या कारमधून बाहेर आलेल्या एका व्यक्तीने घडलेल्या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत कारमधील प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
हा अपघात बरेलीमधील इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक कार कलापूर येथील कालव्यात पडली. या कारमधून तिघे जण प्रवास करत होते. ते पिलीभित येथे जात असताना वाटेत बरेली येथे हा अपघात झाला. गुगल मॅपच्या आधारे आम्ही प्रवास करत होतो. मात्र त्याचदरम्यान हा अपघात झाल्याचा दावा अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कलापूर कालव्याजवळ बरकापूर तिराहा गावाजवळ रस्ता बंद करण्यात आलेला आहे. मात्र चालकाला त्याचा अंदाज आला नाही आणि कार कालव्यात पडली. सुदैवाने कारमधील तिघेही प्रवासी बालंबाल बचावले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने कारला बाहेर काढण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले की, औरैया येथील रहिवासी असलेले दिव्यांशू सिंह हे त्यांच्या कारमधून जीपीएसवर रस्ता पाहत पिलिभीत येथे जात होते. त्याचदरम्यान ,कलापूर कालव्याजवळ तुटलेला रस्ता त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांची कार ही कालव्यात पडली. शॉर्टकट घेण्याच्या प्रयत्नात ते मुख्य रस्त्याऐवजी या मार्गाकडे वळले होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.