गुगल मॅपने दाखवला भलताच रस्ता, थेट पोहोचला भारत-पाकिस्तान बॉर्डरवर, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 03:58 PM2022-05-08T15:58:08+5:302022-05-08T15:58:41+5:30
Google map News: बाडमेर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या क्षेत्रामध्ये गुगल मॅपच्या मदतीने रस्ता शोधून जाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. ही व्यक्ती ओदिशामधून रस्त्यावरून सायकलवरून सौदी अरेबियाच्या प्रवासावर निघाली होती.
जयपूर - बाडमेर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या क्षेत्रामध्ये गुगल मॅपच्या मदतीने रस्ता शोधून जाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. ही व्यक्ती ओदिशामधून रस्त्यावरून सायकलवरून सौदी अरेबियाच्या प्रवासावर निघाली होती. तो पाकिस्तानमधून अफगाणिस्तान, इराण आणि इराक मार्गे सौदी अरेबियाला जात होता. त्यासाठी त्याने प्रवासासाठी गुगल मॅपची मदत घेतली. पण बाडमेर जिल्ह्यात येऊन तो मार्ग भरकटला. तो वाट चुकून तो बाडमेर जिल्ह्या मुख्यालयापासून ७० किमी दूर असलेल्य भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रतिबंधित गागरिया गावात पोहोचला. गाररिया गावामध्ये पोलीस, बीएसएफ आणि संरक्षण यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेतलं, आता त्याची चौकशी केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार शेख वासिफ २५ मार्च रोजी हैदराबाद येथून रवाना झाला होता. मात्र भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील बाडमेरमधून पाकिस्तान येथून मक्का मदिना येथे जाऊ इच्छित होता. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुठल्याही प्रकारची घुसखोरी हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दले हाय अलर्टवर असतात. यादरम्यान ओदिशामधून वर्ल्ड टूरवर निघालेला शेख वासिफ सायकलवरून गागरिया येथे पोहोचला.
एवढंच नाही तर ओदिशामधील शेख वासिफ प्रतिबंधित भागात तब्बल ७० किमीपर्यंत आत गेला. याची खबर सुरुवातीला सुरक्षा यंत्रणा, बाडमेर पोलीस आणि बीएसएफला लागली नाही. मात्र याची माहिती मिळताच खळबळ उडाली. त्यानंतर या व्यक्तीला पकडण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्यांची सुमारे दोन दिवस संयुक्तपणे चौकशी केली. त्यामध्ये या व्यक्तीकडील सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला सोडण्यात आले.
बाडमेरचे पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी सांगितले की, मक्का-मदिनाच्या यात्रेसाठी निघालेला हा प्रवासी गुगल मॅपवरील नकाशावरून प्रतिबंधित परिसरात पोहोचला होता. अखेर रामसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर स्थिती स्पष्ट झाल्यावर त्याला सोडण्यात आले. या व्यक्तीकडे टुरिस्ट व्हीसा होता.