भारतीय छोट्या, मध्यम उद्योगांना गुगलची सेवा
By admin | Published: January 6, 2017 02:00 AM2017-01-06T02:00:09+5:302017-01-06T02:00:09+5:30
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लघु व मध्यम उद्योगांसाठी डिजिटल अनलॉक्ड् नावाची नवी सेवा सुरू केली आहे
नवी दिल्ली : गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लघु व मध्यम उद्योगांसाठी डिजिटल अनलॉक्ड् नावाची नवी सेवा सुरू केली आहे. फिक्कीच्या सहकार्याने सुरू केलेल्या सेवेत ९0 दिवसांचे ट्रेनिंग व्हिडीओ व आठ तासांचा ट्रेनिंग कार्यक्रम आहे.
पिचाई यांनी सांगितले की, मी चेन्नईत शिक्षण घेत होतो, तेव्हा माहिती ही दुर्मीळ बाब होती. तथापि, इंटरनेटमुळे आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही माहितीचा स्रोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करीत आहोत. इंटरनेटच्या मदतीने छोटे उद्योगही मोठे होऊ शकतात. नोटाबंदीच्या काळात वॉलनटच्या अॅपने २ दशलक्षावरून ५ लक्ष वापरकर्त्यांवर घेतलेली झेप हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सायबर सुरक्षा व मजबुती या मुद्द्यात लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी गुगलला केले.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी छोट्या व मध्यम उद्योगांना डिजिटल अनलॉक्ड्च्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. भारतभरातील ४0 शहरांत ५ हजार वर्कशॉप घेण्याची गुगलची योजना आहे. प्रीमिअर नावाचे अॅपही उपलब्ध होईल. हिंदी, इंग्रजी, तामिळी, तेलगू आणि मराठी या भाषांत ते विकसित केले जात आहे. हे मोफत अॅप आॅफलाइनही काम करील. (लोकमत न्यूज नेटवर्क)