भारतीय वंशाचा इंजिनीअर बनवणार गुगलचा स्मार्टफोन
By admin | Published: June 16, 2017 03:38 AM2017-06-16T03:38:23+5:302017-06-16T03:38:23+5:30
भारतीय वंशाचे इंजिनीअर मनु गुलाटी यांच्यावर गुगलने मोठी जबाबदारी सोपविली आहे. गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन बनविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
लॉस एंजिलिस : भारतीय वंशाचे इंजिनीअर मनु गुलाटी यांच्यावर गुगलने मोठी जबाबदारी सोपविली आहे. गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन बनविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
मनु गुलाटी यांनी अॅपल व आयफोनसाठी मुख्य आर्किटेक्ट म्हणून आठ वर्षे काम केले आहे. आता गुगलच्या पिक्सेल फोनसाठी ते पुढाकार घेणार आहेत. गुलाटी यांनी नोकरी बदलत असल्याचे जाहीर केले आहे. गुगलसाठी ते लिड एसओसी आर्किटेक्ट म्हणून काम करणार आहेत. गुलाटी यांच्याकडे चिप डिझाइनचे १५ पेटंट आहेत. गुगलच्या योजनेसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
आयफोन, आयपॅड आणि अॅपल टीव्हीसाठी कस्टम चिप बनविण्यात गुलाटी यांचा सिंहाचा वाटा होता. २०१० च्या आयपॅडमधील ए ४ आणि ए ९ चिप्स त्यांनीच तयार केल्या होत्या. अॅपल सद्या त्यांचे स्मार्टफोन प्रोसेसर बनविते. परंतु, गुगल ते तयार करत नाही. उदाहरणार्थ, अॅपलचे नवे ए १० एक्स चिप इंटेलसारख्या कंपन्यांऐवजी स्वत:कडेच बनते. यामुळे गुगल अन्य कंपन्यांच्या तुलनेत या क्षेत्रात अग्रेसर होऊ शकते. अॅपलसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. गुलाटी हे गुगलसाठी काम करणार असल्याच्या वृत्ताला गुगलने दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)