गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

By admin | Published: July 12, 2017 05:35 AM2017-07-12T05:35:00+5:302017-07-12T05:35:00+5:30

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात १८ विरोधी पक्षांच्या वतीने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी उतरणार आहेत.

Gopalakrishna Gandhi Vice Presidential Candidate | गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

Next

शीलेश शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात १८ विरोधी पक्षांच्या वतीने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी उतरणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे ही माहिती दिली.
गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीला सर्व १८ विरोधी पक्षांनी संमती दिली. त्यात जनता दलाचा (यु) समावेश आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे.
आम्ही गांधी यांच्याशी बोललो आहोत. त्यांनी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार व्हायला तयारी दाखवली आहे, असे सोनिया गांधी बैठकीनंतर म्हणाल्या. काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांच्यासह विरोधी पक्षनेते गोपालकृष्ण गांधी यांना त्यांची निवडणुकीसाठी संमती घेण्यासाठी दूरध्वनीवर बोलले.
त्यांनी विचार करण्यासाठी १० ते १५ मिनिटे घेतली. नंतर त्यांच्याशी पुन्हा दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आल्यावर ते ही निवडणूक लढण्यास तयार झाले. गोपालकृष्ण गांधी यांनी सगळ्या विरोधी नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
।महात्मा गांधी व राजगोपालाचारी यांचे नातू
गोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे व देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे नातू आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्याशिवाय योग्य व्यक्ती असू शकत नाही. ते एकमताने निवडून येतील अशी आशा आहे, असे येचुरी म्हणाले. गांधी यांचे नाव सगळ्यात आधी ओ’ब्रायन यांनी सुचवले व नंतर बसपचे सतीश मिश्र, येचुरी आणि इतर सगळ्यांनी. सगळ्या पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा द्यावा, असे गोपालकृष्ण गांधी यांचे म्हणणे होते. आमची विनंती त्यांनी स्वीकारली, असे ओ’ब्रायन म्हणाले.
।गांधी यांचे नाव निश्चित करण्यासाठी विरोधी नेत्यांनी फक्त १५ मिनिटे घेतली. केवळ त्यांच्याच नावावर चर्चा झाली आणि एकमताने त्यांना पाठिंबा दिला गेला, असे सूत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांमध्ये आधीच व्यापक सहमती होती व चांगला समन्वयदेखील होता. उमेदवारी अर्जावर जनता दलाचे (यु) नेते शरद यादव यांच्यासह इतर नेत्यांनी स्वाक्षरी केली असून अर्ज नंतर सादर केला जाणार आहे.

Web Title: Gopalakrishna Gandhi Vice Presidential Candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.