गोरखपूर, महंतांना निवडून देणारा मतदारसंघ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 02:35 PM2018-03-14T14:35:54+5:302018-03-14T14:35:54+5:30
खासदारांमध्ये गोरखपूरच्या मठाच्या महंतांची संख्या जास्त आहे.
मुंबई- पूर्व उत्तरप्रदेशातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गोरखपूर मतदारसंघ ओळखला जातो. 1952 पासून आजवरच्या येथील खासदारांमध्ये गोरखपूरच्या मठाच्या महंतांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक काळ या मठातील महंतांना या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. 1952 साली पहिल्या लोकसभेसाठी सिंहासन सिंग येथून निवडून गेले. त्यानंतर 1957, 1962 असे पुन्हा दोन वेळेस ते लोकसभेत याच मतदारसंघातून गेले.
1967 साली दिग्विजयनाथ गोरखपूर मठाचे महंत अपक्ष म्हणून लोकसभेत गेले तर 1970 साली महंत अवदेयनाथ अपक्ष म्हणून येथे विजयी झाले. 1971 साली नरसिंग नारायण पांडे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेले. आणीबाणी संपेपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. त्यानंतर 1977 साली जनता लाटेमध्ये भारतीय़ लोकदलाचे हृषिकेश बहादूर विजयी झाले. 1980 साली हृषिकेश बहादूर काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेले. आठव्या लोकसभेसाठी काँग्रेसने गोरखपूरमधून मदन पांडे यांना संघधी दिली आणि ते विजयी झाले. 1989 साली महंत अवदेयनाथ हिंदू महासभेच्या तिकिटावर लोकसभेत गेले. तर 1991 आणि 1996 असे दोनवेळेस ते भाजपाच्या तिकिटावर विजयी झाले. त्यानंतर वयाच्या केवळ २६ व्या वर्षी योगी आदित्यनाथ यांना खासदार होण्याची संधी मिळाली आणि सलग पाच वेळा खासदार होत त्यांनी 2014 सालच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी हा गड सोडला नाही. 2017 साली त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद सोडेपर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापुर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या ओळखीबद्दल लोकसभेतील आपल्या भाषणात एक मजेशीर आठवण सांगितली. गोरखपूर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अत्यंत वाईट समजले जायचे. 26 वर्षाचे आदित्यनाथ जेव्हा पहिल्यांदा निवडून गेले तेव्हा ते एका कामासाठी तत्कालीन रसायन आणि उर्वरक मंत्रालयाचे मंत्री सुरजितसिंग बर्नाला यांना भेटायला गेले. बर्नाला यांना हा तरुण महंत गोरखपूरचा खासदार असेल यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी तीनवेळा तुम्ही खरंच गोरखपूरचे खासदार आहात का असे त्यांना विचारुन खात्री करुन घेतली. तुम्ही अशी खात्री का करुन घेत आहात असे आदित्यनाथांनी विचारल्यावर बर्नाला यांनी एक जुनी आठवण सांगितली. मी एकदा सभेसाठी गोरखपूरला गेलो तेव्हा चारही बाजूंनी दगडफेक, बॉम्बफेक सुरु झाली, तेव्हापासून मी गोरखपूरला कधीच गेलो नाही असं त्यांनी आदित्यनाथांना सांगितलं. ही कायदा आणि सुव्यवस्थेची खराब परिस्थिती आपण सुधारली असा दावा आदित्यनाथ करतात. मात्र आता होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये त्याचे कोणतेही प्रतिबिंब दिसत नाही.