गोरखपूर बालमृत्यू प्रकरण - आरोपी डॉक्टर काफिल खानला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 10:18 AM2017-09-02T10:18:09+5:302017-09-02T10:24:07+5:30
गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात (बीआरडी) गेल्या महिन्यात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टर काफिला खानला अटक करण्यात आली आहे.
लखनऊ, दि. 2 - गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात (बीआरडी) गेल्या महिन्यात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टर काफिला खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष कृती दलाकडून ही अटकेची कारवाई करण्यात आली. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात फक्त सहा दिवसांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला होता. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी ऑक्सिजन थांबवण्यात आल्याने 30 मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.
#GorakhpurTragedy: Uttar Pradesh STF arrests accused Dr Kafeel Khan from Gorakhpur.
— ANI UP (@ANINewsUP) September 2, 2017
या धक्कादायक घटनेनंतर डायरेक्टर जनरल ऑफ मेडिकल एज्युकेशन के के गुप्ता यांनी 23 ऑगस्ट रोजी सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव राजीव कुमार यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवली होती. तपास पुर्ण झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट सादर केला होता. यानंतर वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती.
याआधी निलंबित करण्यात आलेले बीआरडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ पुर्णिमा यांना आधीच अटक करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.डॉ काफिल यांच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.
बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात ऑगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी दिली होती.
मेंदुज्वर रुग्ण कक्षात ८३ आणि नवजात शिशू कक्षातील २१३ बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. याच इस्पितळात मेंदुज्वर, नवजात शिशू आणि बालरुग्ण कक्षात यावर्षी जानेवारीपासून १,२५^^६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली होती.
गंभीर आजारी असलेल्या मुलांना नवजात शिशू अति दक्षता कक्षात उपचारासाठी आणले जाते. यात मुदतपूर्वी जन्मलेली, कमी वजनाची, कावीळ आणि अन्य संसर्गजन्य आजारी असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना तर अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी सांगितले होते.
२०१७ मध्ये १,२५६ जणांचा मृत्यू
ऑगस्ट २०१७ मध्ये कोणत्या रुग्ण कक्षात किती बालके दगावली, याचा तपशीलही त्यांनी दिला होता. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी ३७ बालकांचा मृत्यू झाला. यापैकी २६ बालक नवजात शिशू आयसीयूत आणि ११ मुले मेंदुज्वर उपचार कक्षात मरण पावली.