गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : ऑक्सिजन पुरवठा कधी रोखला नव्हताच, कंपनीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 01:50 PM2017-08-16T13:50:09+5:302017-08-16T13:58:05+5:30

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ऑक्सिजन पुरवठ्या अभावी झालेल्या 65 हून अधिक मुलांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्स प्रायव्हेट लिमिटेडनं ऑक्सिजनचा पुरवठा कधीही थांबवण्यात आला नव्हता, असा दावा केला आहे.  

Gorakhpur Child Matters: Oxygen supply was never stopped, company claims | गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : ऑक्सिजन पुरवठा कधी रोखला नव्हताच, कंपनीचा दावा

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : ऑक्सिजन पुरवठा कधी रोखला नव्हताच, कंपनीचा दावा

Next

गोरखपूर, दि. 16 - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ऑक्सिजन पुरवठ्या अभावी झालेल्या 65 हून अधिक मुलांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्स प्रायव्हेट लिमिटेडदेखील वादाच्या भोव-यात अडकली आहे. मात्र, हॉस्पिटलकडे 69 लाख रुपये थकीत असताना ऑक्सिजनचा पुरवठा कधीही थांबवण्यात आला नव्हता, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.  बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमधील ही दुर्घटना आहे. 

बालमृत्यूप्रकरणावर कंपनीनं आपलं मौन सोडत सांगितलं की, कंपनीकडून कधीही ऑक्सिजन पुरवठ्यावर रोख लावण्यात आलेली नव्हती. पुष्पा सेल्स प्रायव्हेट लिमिटेडनं स्पष्टीकरण देताना असे सांगितले की, पुष्पा सेल्सचे थकीत बिल न भरल्यानंतरही बीआरडी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच होता. या महिन्यातील पहिला पुरवठा 4 ऑगस्ट रोजी करण्यात आला होता. यानंतर 12 ऑगस्ट रोजी पुन्हा पुरवठा करण्यात आला.  30 जुलै रोजी हॉस्पिटलला नोटीस बजावून थकबाकी 15 दिवसांत भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र असे असताना ऑक्सिजनचा पुरवठा रोखण्यात आलेला नव्हता. 

वाचा आणखी बातम्या
(गोरखपूर घटनेतील बळींची संख्या 63, BRD कॉलेजच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई)

(गोरखपूरच्या इस्पितळातील मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच -  उद्धव ठाकरे)

(अशा दुर्घटना होत असतात, गोरखपूर बालमृत्यूकांडावर अमित शाहांचं बेजबाबदार वक्तव्य)

बालमृत्यू प्रकरणी मानवाधिकार आयोगाची उत्तर प्रदेश सरकारला नोटीस

दरम्यान, बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावत अहवाल मागवला आहे. त्यानुसार येत्या चार आठवड्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, असे मानवाधिकार आयोगाने बजावले आहे. 

आयोगाने या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावताना या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली आहे. तसेच पीडितांना काय मदत केली आहे याची माहिती मागवली आहे. दरम्यान, या प्रकरणी दखल घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळून लावत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला न्यायाधिशांनी याचिकाकर्त्याला दिला.  

गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये ६३ हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते.  त्यात नवजात बालकांची संख्याही मोठी आहे. मृत्यू झालेल्या 17 नवजात बालकांपैकी बऱ्याच बालकांना जन्मताच फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखभालीची गरज होती. त्यानंतर ज्या डॉक्टरांनी त्यांना रुगालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांनी या मुलांना नियमित ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.  बालरोग विभागात ऑक्सिजनचा तुटवडा आणि संसर्ग, यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले, तरी हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. 
 

Web Title: Gorakhpur Child Matters: Oxygen supply was never stopped, company claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.