गोरखा जनमुक्ती मोर्चानेही सोडली एनडीए, बिमल गुरंग तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:52 AM2020-10-22T08:52:18+5:302020-10-22T08:53:21+5:30
फरार गोरखा नेते बिमल गुरंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत एनडीएला सोडचिठ्ठी दिल्याची आणि प. बंगाल विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची आणि भाजपविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
कोलकाता : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडत गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. शिरोमणी अकाली दल बाहेर पडल्याच्या धक्क्यातून भाजप पुरती सावरलेली नसताना जीजेएमने साथ सोडत प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी एनडीएला हादरा दिला आहे.
फरार गोरखा नेते बिमल गुरंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत एनडीएला सोडचिठ्ठी दिल्याची आणि प. बंगाल विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची आणि भाजपविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली. एनडीएने आश्वासन देऊनही अद्याप ११ गोरखा समुदायांना अनुसूचित जातीचा दर्जा दिला नाही. भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार पहाडी विभागासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यानने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र राज्याच्या (गोरखालँड) मागणीसाठी दार्जिलिंगमध्ये झालेल्या आंदोलनापासून जीजेएम नेते बिमल गुरंग २०१७ पासून फरार आहेत. स्वतंत्र राज्याच्या मागणीपासून माघार घेणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी या मुद्याला पाठिंबा देणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले.
जीजेएमचा संसदेत एकही खासदार नाही. जीजेएमच्या सूत्रांनुसार गुरंग गेल्या एक महिन्यापासून तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आमचा पाठिंबा असेल आणि भाजपविरुद्ध लढू. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ११ समुदायांचा अनुसूचित जातीच्या यादीत समावेश करण्यास मंजुरी दिली आहे; परंतु केंद्र सरकारने मात्र कोणतीही हालचाल केली नाही, असा दावाही त्यांनी केला.
मी राजकीय नेता आहे. मला राजकीय तोडगा हवा. तीन वर्षे मी दिल्लीत आणि गेली दोन महिने झारखंडमध्ये होतो. उत्तर बंगालमधील ५४ विधानसभेच्या जागांपैकी १० ते १२ मतदारसंघांत गुरुंग यांच्या संघटनेचे वर्चस्व आहे.
१0 ते १२ मतदार संघांमध्ये संघटनेचे वर्चस्व
२०१७ मधील दार्जिलिंग आंदोलनावरून माझ्याविरुद्ध १५० दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे फौजदारी आणि राष्टÑविरोधी नाहीत, असे गुरंग यांनी सांगितले. गेली दोन महिने झारखंडमध्ये होतो, असे ते म्हणाले. उत्तर बंगालमधील ५४ विधानसभेच्या जागांपैकी १० ते १२ मतदारसंघांत गुरुंग यांच्या संघटनेचे वर्चस्व आहे.