गोरक्षकांचा उच्छाद, मोदींचे फटकारे व्यर्थ
By admin | Published: August 11, 2016 02:03 AM2016-08-11T02:03:24+5:302016-08-11T02:03:24+5:30
रक्षणाच्या नावाखाली मारहाण करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारून तीन दिवसही झाले नाहीत, तोच उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशात गोरक्षकांनी पुन्हा कायदा हातात घेतल्याचे
काकीनाडा/अलिगड : गोरक्षणाच्या नावाखाली मारहाण करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारून तीन दिवसही झाले नाहीत, तोच उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशात गोरक्षकांनी पुन्हा कायदा हातात घेतल्याचे उघड झाले आहे. एका घटनेत मृत गायीची कातडी काढणाऱ्या दलितांना, तर दुसऱ्या घटनेत वाहनातून म्हशी नेणाऱ्यांना गोरक्षकांनी लक्ष्य केले.
आंध्र प्रदेशच्या अमलापूरम शहराजवळ जानकीपेट येथे दोन दलित मृत गायींची कातडी काढत होते. याची माहिती मिळताच गोरक्षक तेथे गेले आणि त्यांना बेदम मारहाण केली. मोकाटी इलिशा आणि लाझेर अशी मारहाण झालेल्या दलितांची नावे असून, त्यांना उपचारासाठी अमलापूरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इलिशा याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. ही गाय विजेच्या धक्क्याने दगावली होती. गाय मालकाने तिची कातडी काढण्यासाठी या
दोघांना बोलावले होते. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी आम्ही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू असून आम्ही संशयितांचा माग काढत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
खडे बोल ऐकूच आले नाहीत?
1तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना जाहीरपणे फटकारले होते. दिवसा गोरक्षक असल्याचे सांगून हे लोक रात्री गुन्हे करीत असल्याचे खडे बोल मोदींनी सुनावले होते.
2त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेलंगणात बोलताना मोदींनी बोगस गोरक्षक समाजात तणाव आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन लोकांना केले होते. मोदींनी गोरक्षकांना उद्देशून तुम्हाला हल्ला करायचाच असेल, तर माझ्यावर करा; परंतु माझ्या दलित बांधवांना लक्ष्य करायचे थांबवा, असे आवाहन गोरक्षकांना केले होते.
गोरक्षकांनी वाहनातून म्हशी नेणाऱ्या चार जणांना संशयावरून मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली. बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष केदार सिंह यांनी या गोरक्षकांचे नेतृत्व केले. संशयित लोक गुरे चोरणारे आहेत, असा आरोप त्यांनी केला.
अलिगढ जिल्ह्यातील जिरौली गावाजवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हशी नेणारे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने वेग वाढविला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आरडाओरड केली आणि त्यांच्या इतर साथीदारांनी पुढचा रस्ता बंद केला.
रस्ता बंद केल्याचे पाहून वाहनातील चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले व मारहाण करीत पोलिसांच्या स्वाधीन केले, असे सूत्रांनी सांगितले. या चौघांनी गुरे चोरल्याचा संशय असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.