गोरक्षकांची आता काश्मीरमध्येही झुंडशाही
By admin | Published: April 23, 2017 12:48 AM2017-04-23T00:48:53+5:302017-04-23T00:48:53+5:30
गोरक्षकांच्या झुंडशाहीचे लोण काश्मीरमध्येही पसरले असून, त्यांच्या हल्ल्यात येथील एकाच भटक्या कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. त्यात एका नऊ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
श्रीनगर : गोरक्षकांच्या झुंडशाहीचे लोण काश्मीरमध्येही पसरले असून, त्यांच्या हल्ल्यात येथील एकाच भटक्या कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. त्यात एका नऊ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
जम्मू काश्मीरमधील रेआसी जिल्ह्यात हा प्रकार घडला. हे कुटुंब शुक्रवारी आपले सर्व सामान आणि गायी, गुरे, बकऱ्या, मेंढ्या घेऊ न घेऊन तलवारा परिसरात राहण्यासाठी जाण्यास निघाले असताना, त्यांच्यावर हा हल्ला झाला. गोरक्षकांनी आम्हाला लोखंडाच्या सळीने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हे गोरक्षक सर्व सामान, तसेच बकऱ्या, मेंढ्या आणि गायी घेऊन गेले असे या लोकांनी सांगितले. गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सर्व हल्लेखोरांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. आम्ही एफआयआर दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
मुलगा अद्यापही बेपत्ता
त्या गोरक्षकांनी आम्हाला अमानुष मारहाण केली. कसाबसा आपला जीव वाचवून आम्ही तिथून पळ काढला. आमचा १0 वर्षांचा मुलगा तेव्हापासून बेपत्ता आहे. आम्ही त्याला अद्याप शोधत आहोत. आमच्यातील वृद्धांनाही त्यांनी मारहाण केली. हत्या करून आमचे मृतदेह नदीत टाकण्याची त्यांची योजना होती, असे कुटुंबातील नसीम बेगम म्हणाल्या.