गोतस्करीच्या संशयावर कथित गोरक्षकांचा दोघांवर हल्ला
By admin | Published: May 6, 2017 09:11 AM2017-05-06T09:11:10+5:302017-05-06T09:11:56+5:30
ग्रेटर नोएडामधील कथित गोरक्षकांकडून गोतस्करीच्या संशयावरुन दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - ग्रेटर नोएडामधील कथित गोरक्षकांकडून गोतस्करीच्या संशयावरुन दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जबर सिंह(35) आणि भूप सिंह (45) या दोघांनी एक गाय व तिचे वासरू शेजारी असलेल्या एका गावातून खरेदी केले. गाय व तिचे वासरु घरी आणताना प्रवासादरम्यान एका ठिकाणी विश्रांतीसाठी हे दोघं जण थांबले तेव्हा गोरक्षकांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप या दोघांनी केला आहे.
गो-तस्कर नसल्याचा विश्वास पटवून दिल्यानंतर या दोघांची सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भूप सिंह यांनी शेजारी असलेल्या मेहंदीपूर गावातून गायसहीत तिच्या वासराची खरेदी केल्यानंतर त्यांना घेऊन ते निवासस्थानाकडे परतत होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गाय-वासरू घेऊन जाणारे दोघंही पायी प्रवास करत होते. चालून चालून थकल्यानं एका झाडाचा आडोसा घेत ते विश्रांतीसाठी तेथे थांबले. याचदरम्यान कथित गोरक्षकांचा गट येथे दाखल झाला.
तक्रारीमध्ये भूप सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, आमच्यावर जवळपास 8 ते 9 जणांनी हल्ला केला. कोणतेही ठोस कारण नसतानाही हल्ला करण्यात आला व काहीही विचारपूस न करता टोळक्यानं थेट मारहाण करायला सुरुवात केली. आम्ही गो-तस्कर नसून दुग्धोत्पादनसंबंधी काम करत असल्याचं सांगितल्यानंतर हल्लेखोरांनी आमची सुटका केली.
भूप सिंह यांच्या कुटुंबातील एका सदस्यानं सांगितले की, आम्ही गरीब आहोत. आम्हाला डेअरीच्या कामासाठी गाय हवी होती. यावरचे आमचे व कुटुंबीयांचे पोट भरते. दरम्यान, कथित गो-रक्षकांनी केलेल्या हल्ल्यात दोघं बरेच जखमी झाले आहेत.
हल्ल्यात जखमी झालेल्या या दोघांना सुरुवातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना नोएडातील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
बेदम मारहाणीमुळे दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. जेवरचे पोलीस अधिकारी अजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 5 अज्ञातांचा समावेश आहे. मारहाण करणा-यांपैकी महेश, आशीष ओमपाल आणि गौरव या चौघांची ओळख पटली असून, हे जवळपासच्या परिसरातच राहणारे आहेत.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या गौरक्षा युनिटनं अशा प्रकारच्या कारवाईमागे ते नसल्याचे स्पष्ट केले आहे.